पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमाेर झालेल्या बैठकीत आशा व गटप्रवर्तकांचे मानधन अडीच ते तिप्पट वाढविण्याचे आश्वासन आराेग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले हाेते. परंतु त्या बाबतचा जीआर अद्याप निघालेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी याबाबतचा जी. आर काढावा या मागणीसाठी आज आशा स्वयंसेविकांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला हाेता.
आशा स्वयंसेविकांना कामावर आधारित माेबादला धरुन 2500 रु सरासरी दरमहा मानधन मिळते. तर गटप्रवर्तकांना टीएडीए म्हणून मासिक 8725 रु मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी राज्याच्या आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीची मागणी आहे. तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना वेठबिगारासारखे वागविले जाते. तसेच त्यांच्याकडून इतरही कामे करुन घेतली जातात असा आराेपही कृती समितीकडून करण्यात आला आहे. देशामध्ये काही राज्यांमध्ये आशा स्वयंसेविकांना 10 हजार रु. मानधन दिले जाते. 6 फेब्रुवारी राेजी एकनाथ शिंदे यांनी अडीच ते तिप्पट मानधन वाढविण्याचे आश्वासन दिले हाेते. तसेच 4 जून राेजी आशा स्वयंसेविकांनी मंत्रालयावर विशाल माेर्चा काढला हाेता. त्यावेळी खात्याचे राज्यमंत्री विजय देशमुख यांनी देखील मानधनवाढीबाबत लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले हाेते. त्यानंतर 14 जून राेजी उद्व ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देखील एकनाथ शिंदे यांनी मानधन वाढविण्याचे ठाेस आश्वासन दिले हाेते.
परंतु अद्याप गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांच्या मानधनवाढीचा जीआर निघाला नसून आचारसंहिता लागल्यानंतर जीआर काढता येणार नाही. त्यामुळे तत्पूर्वी जीआर काढण्याची मागणी कृती समितीच्या वतीने करत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्यात आला.