लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या लसींच्या आधारावर शुक्रवारी पुणे शहरातील लसीकरण केंद्र सुरू झाली़ मात्र, १७२ लसीकरण केंद्रांपैकी अनेक केंद्रांवर दुपारी बारा एक वाजताच लस संपल्याने लसीकरणाचे काम आटोपते घ्यावे लागले़ तर ३० केंद्रांवरील लसीकरणाचे काम आज पूर्णत: बंद होते़
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत राज्य शासनाकडून महापालिकेकडे लस प्राप्त झाल्या नसल्याने, शनिवारी १७२ पैकी किती लसीकरण केंद्र सुरू होणार व ती किती वेळ कार्यरत राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे़
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार महापालिकेच्या साठ्यात सद्यस्थितीला केवळ १९० डोस शिल्लक आहेत़ तर शुक्रवारी दिवसभरात दीड हजार डोस वितरित करण्यात आले आहेत़ परंतु, काही खासगी रूग्णालयांनी तथा महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर मिळून साधारणत: दहा हजार लस यापूर्वी घेतलेल्या आहेत़ त्यामुळे शनिवारी काही प्रमाणात मोजक्या लसीकरण केंद्रांवर शंभर पेक्षा अधिक जणांना लस मिळण्याची शक्यता आहे़
-----------------------------------------------