पुणे : काेरोना संपत आल्यावर राज्याच्या आराेग्य विभागाने रेमडेसिवीर औषधांची खरेदी केली. त्यापैकी पुणे शहर व जिल्ह्याला ३० काेटी रुपयांची २ लाख ४० हजार व्हायल्स दिल्या. परंतु, हा औषध साठा मुदतबाह्य होणार असल्याचे कळवूनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे या ३० कोटींच्या रेमडेसिवीर कालबाह्य झाल्याने औषधाच्या कालबाह्य साठ्याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, तसेच आरोग्य संचालक डाॅ. नितीन अंबाडेकर यांचे निलंबन करावे, अन्यथा न्यायालयात लाचलुचपत विभागाकडे दाद मागणार असून, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
संभूस पुढे म्हणाले की, आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या रेमडेसिवीरच्या साठ्यापैकी ४६ टक्के साठा पुण्याला दिला हाेता. ताे साठा यावर्षी ३० एप्रिल राेजी कालबाह्य हाेणार हाेता. त्यापूर्वी महिन्याआधीच मनसेने आरोग्य संचालक डाॅ. नितीन अंबाडेकर यांना कळवले होते. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी समिती स्थापन केली. या समितीने साठा कालबाह्य झाल्याचा अहवाल दिला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार देऊनही काहीच कार्यवाही नाही. मुख्यमंत्री कार्यक्षम आहेत, असे म्हणतात, पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
आराेग्य खात्याच्या लक्षात आणून देऊनही ताे साठा परत कंपनीला केला नाही. मेडिकलमधून कालबाह्य हाेत आलेला साठा कंपन्या परत घेतात; मग शासनाकडून का नाही. म्हणजेच या औषध खरेदी प्रकरणात खरेदी-विक्रीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याला आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालक जबाबदार आहेत. हा नागरिकांच्या पैशांचा गैरवापर करण्यात आला आहे.
- हेमंत संभूस, सरचिटणीस, मनसे