पुणे : पालिकेत सुरक्षारक्षक नेमण्यासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निविदेमधील अटी व शर्ती या भाजपाशी संबंधित असलेल्या ठेकेदार कंपन्यांना काम मिळावे अशाच घालण्यात आल्या आहेत. कामगारांचे वेतन नियमानुसार न दिल्याने एका कंपनीची चौकशी सुरू आहे. ही निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केली आहे.
पालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये ठेकेदारी पद्धतीने सुमारे दीड हजार सुरक्षारक्षक नियुक्त करण्यासाठी तीस कोटी रुपयांची निविदा काढली गेली आहे. ही निविदा ठराविक कंपन्यांनाच मिळावी त्यादृष्टीनेच निविदेतील अटीशर्ती ठरविल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्रिस्टल आणि सैनिक या दोन कंपन्या पात्र ठरतील अशा पद्धतीने ही निविदा प्रक्रिया राबविली जात आहे.
या दोन्ही कंपन्या या भाजपच्या नेत्यांशी संबंधित असून, यापैकी एका कंपनीने राज्य सरकारच्या नियमानुसार रखलवादारांना वेतन दिले नसल्याने कंपनीची चौकशी सुरू आहे. ही कंपनीदेखील या निविदा प्रक्रियेत पात्र कशी ठरली, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.