पुणे : कोरोना काळात क्षयरोगाच्या नोंदीमध्ये सुमारे ३० टक्क्यांनी घट झाली. जानेवारी २०२० च्या तुलनेत एप्रिल २०२० मध्ये ५४ टक्के, तर जानेवारी २०२१ च्या तुलनेत एप्रिल २०२१ मध्ये ४२ टक्के घट झाली. कोविडपूर्व काळात महाराष्ट्रात दर महिन्याला सरासरी १९ हजार क्षयरोग्यांची नोंद होत असे. एप्रिल २०२१ मध्ये १० हजार ३६ रुग्णांची नोंद झाली. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम गतिमान करण्याचा मानस आरोग्य संचालनालने व्यक्त केला.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘कोरोनाचा क्षयरोग कार्यक्रमावरील परिणाम’ या विषयावरील चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. आर. एस. आडकेकर, डॉ. दिलीप माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. पाटील म्हणाल्या, “क्षयरोग कार्यक्रम व्यवस्थापक आणि प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी यांनी कोविड-१९ शी लढा दिला. कोरोनाच्या चाचण्यांसाठी क्षयरोग निदान यंत्रांचा, सीबीएनएएटी (जेनएक्स्पर्ट आणि ट्रूनॅट) यांचा वापर करण्यात आला. मनुष्यबळ आणि निदान उपकरणांचा वापर कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी करण्यात आल्यामुळे क्षयरोग सेवांवर बराच परिणाम झाला. जनसामान्यांमध्ये खोकला या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या लक्षणाबद्दल असलेली भीती आणि कलंकाची भावना यामुळे सरकारदफ्तरी नोंदणी झालेल्या क्षयरुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट झाली.”
“भारतातील एमडीआर टीबीचे प्रमाण जगाच्या तुलनेत भारतात २६ टक्के, तर मृत्यूदर ३६ टक्के इतका आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे ध्येय गाठायचे आहे. खासगी वैद्यकीय क्षेत्राचा सहभाग, समुदायाचा सहभाग आणि जाणीवजागृती यामुळे हा कार्यक्रम कोविडपूर्व पातळीवर आणू शकू आणि २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे ध्येय गाठू शकू,” असा विश्वास राज्य क्षयरोग अधिकारी डॉ. अडकेकर यांनी व्यक्त केला.
चौकट
९६ टक्के क्षय रोग्यांवर उपचार
कोविड-१९, क्षयरोग आणि इन्फ्लुएंजासारखे आजार (आयएलआय) आणि गंभीर स्वरूपाचे श्वसनाचे संसर्ग (एसएआरआय) झालेल्या व्यक्तींची द्वि-दिशात्मक तपासणी केली जाते. ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत ४ लाख ६७ हजारांहून अधिक रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्यात आली. यातल्या ५ हजार २६४ व्यक्तींना क्षयरोगाचे निदान झाले आणि त्यांच्यापैकी ९६% व्यक्तींवर उपचार सुरू करण्यात आले.