बोर्डसमोर प्रस्ताव, जवळपास ११ हजार ६६६ कोटींचा खर्च अपेक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीएमपीचे ३० डेपोचे रूप पालटणार आहे. कारण पीएमपी प्रशासनाने आपल्या डेपोच्या जागा विकसित करण्याचे ठरविले आहे. तसा प्रस्तावदेखील तयार असून येणाऱ्या बोर्ड बैठकीत यावर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल. डेपो विकसित करताना खाली बसेसचे पार्किंगसह कार्यशाळा राहील. इमारतीच्या वरच्या बाजूस मात्र हॉस्पिटल, हॉटेल, कार्यालय आदी असणार आहे. यासाठी ११ हजार ६६६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
पुण्यातील व्ही. के. असोसिएशट मागील सहा महिन्यांपासून पीएमपीच्या डेपो विकसित करण्यासंदर्भात अभ्यास करीत आहे. त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात पीएमपी डेपोचे ठिकाणानुसार तिथे काय करणे अधिक उचित ठरेल हे मांडले आहे. त्यानुसार डेपो कोणत्या भागात आहे, त्यानुसार त्या ठिकाणी कोणती सुविधा देणे हे ठरविण्यात आले आहे.
पीएमपीचे सद्य स्थितीत १३ डेपो आहेत, तर ४ इलेक्ट्रिक बससाठी प्रस्तावित आहेत. उर्वरित १३ डेपोसाठी पीएमपीची मोकळी जागा उपलब्ध आहे.
बॉक्स 1
वर्षाला १५१६ कोटी मिळण्याची अपेक्षा :
पीएमपी आपल्या जागेत कमर्शियल इमारत बांधून ती भाड्याने देईल. यात मोठे हॉस्पिटल, आयटी कार्यालय, हॉटेल्स आदीचा समावेश असेल. त्यातून पीएमपीला वर्षाकाठी किमान १५१६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा निष्कर्ष संबंधित कंपनीने काढला आहे.
बॉक्स 2
दोन पर्यायांचा विचार सुरू :
पीएमपीची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. अशा परिस्थितीत डेपो विकसित करण्यासाठी पीएमपी स्वतः खर्च करणार नाही. तसेच बँकांकडून कर्जदेखील काढणार नाही. त्यामुळे पीपीपी मॉडेलनुसार डेपो विकसित करणे अथवा जागा भाड्याने देणे ह्या दोन पर्यायांचा विचार पीएमपी करीत आहे.
कोट :
पीएमपीचे १७ डेपो व १३ ठिकाणच्या मोकळ्या जागा असे मिळून ३० डेपो विकसित करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच बोर्ड बैठकीत मांडला आहे. येणाऱ्या बैठकीत यावर निर्णय अपेक्षित आहे.
डॉ. राजेंद्र जगताप, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे.