पुणे: महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही कर्मचा-यांच्या नियुक्त्या अन्य विभागात केल्या आहेत. त्यांचे वेतन आरोग्य विभागाकडूनच केले जाते. परंतु, ज्या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. हजेरीच्या नोंदी न आल्याने सुमारे तीस कर्मचा-यांना अद्याप या महिन्यात वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. संबधित विभागाला पत्र पाठवूनही कर्मचा-यांच्या हजेरीच्या नोंदी उपलब्ध करून न दिल्याने मुख्य लेखापाल विभागाने वेतन काढण्यास नकार दिल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांचे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला वेतन होते. तत्पुर्वी सर्वच विभागातून वेतनाची बिले तयार करून मुख्य लेखापाल विभागाकडे पाठविली जातात. त्यानुसार लेखापाल विभाग अधिकारी आणि कर्मचा-यांचे वेतन बँकेत जमा करतात. परंतू या महिन्यात आरोग्य विभागाकडील सुमारे तीन कर्मचा-यांचे जून महिन्याचे वेतनच झाले नसल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले की, आरोग्य विभागाचे चार कर्मचारी अन्न परवाना विभागाकडे नियुक्त आहेत. त्या कर्मचा-यांच्या हजेरीच्या नोंदी अद्याप आरोग्य विभागाकडे आलेल्या नाहीत. साधारण तीस कर्मचा-यांच्या वेतनाच्या डिटेल्स एकाचवेळी लेखापाल विभागाकडे पाठविल्या जातात. परंतु, चार कर्मचा-यांच्या हजेरी नोंदीच न मिळाल्याने आरोग्य विभागाच्या बिलानुसार वेतन करणे शक्य नसल्याचे लेखापाल विभागाकडून सांगण्यात आले. यानंतर अन्न परवाना विभागाला पत्र लिहून नोंदी मागविल्या आहेत. तूर्तास यावर निर्णय घेण्यासाठी प्रकरण अतिरिक्त आयुक्तांकडे पाठविले आहे, असे डॉ. जाधव यांनी नमूद केले.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील ३० कर्मचारी पगाराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 9:47 PM
हजेरीच्या नोंदी न आल्याने सुमारे तीस कर्मचा-यांना अद्याप या महिन्यात वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्देयाप्रकरणी निर्णय घेण्यासाठी प्रकरण तूर्तास अतिरिक्त आयुक्तांकडे