लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात गेल्या दोन वर्षांत डिजिटल सातबारा आता गावा-गावांतील लोकांपर्यंत पोहोचला असून, सोमवार (दि. ५) रोजी राज्यात एकाच दिवसात आतापर्यंतचे उच्चांकी एक लाख डिजिटल सातबारे उतारे डाऊनलोड केले. यामुळे राज्य शासनाला एका दिवसात सर्वाधिक ३० लाखांचा महसूल जमा झाला.
राज्यातील सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना आपल्या दैनंदिन कामासाठी लागणारा सातबारा, आठ ‘अ’चा उतारा सहज व विना हेलपाट्याशिवाय मिळण्यासाठी शासनाने डिजिटल सातबारा प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प सुरू होऊन सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यात राज्यात सर्वच जिल्ह्यात चांगले काम झाले असून, राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे.
याबाबत या प्रकल्पाचे राज्याचे समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले की, राज्यात सन २००३ पासून संगणकीकृत सातबारा मोहीम राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व जिल्ह्यातील ग्रामीण अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण सन २००२-०३ पासून सुरू झाले. सन २०१०- ११ पर्यंत ते जिल्हा स्तरावरच संगणकीकृत केले जात होते.
त्यानंतर महसूल विभागाने ग्रामीण भागातील भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत सुरू असलेल्या ई -फेरफार प्रकल्पाद्वारे संगणकीकरण पूर्ण करण्यात आले. तर सन २०१५-१६ पासून हे सर्व संगणकीकृत अधिकार अभिलेख ऑनलाईन करण्यात आले. राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्यांतील सुमारे २ कोटी ५३ लाख गाव नमुना नं. ७/१२ ऑनलाईन करून त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांचे सर्व उप जिल्हाधिकारी यांनी अहोरात्र कामकाज करून हे काम पूर्णत्वाकडे नेले आहे.
-------
ऑनलाईन सुविधांमुळे सर्वसामान्य नागरिकांची सोय
महसूल विभागाच्या अनेक ऑनलाईन सुविधांमुळे सामान्य माणसाच्या जमीनविषयक आणि सातबारा बाबतच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत. महसूल विभागाच्या अनेक ऑनलाईन सुविधा शेतकरी व बिगर शेतकऱ्यांना लाभदायक ठरत आहेत. डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, खाते उतारे आणि मिळकत पत्रिका ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेले महाभूमी पोर्टल सध्या सर्वच खातेदारांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येत आहे. यामुळेच सोमवारी एका दिवसात राज्यात एक लाखापेक्षा अधिक डिजिटल स्वाक्षरीत सातबारे डाऊनलोड करण्यात आले.
- रामदास जगताप, राज्य समन्वयक ई- फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय, उपजिल्हाधिकारी
-------
सोमवारी असा झाला विक्रम
- ऑनलाईन दस्त नोंदणी झालेल्या दस्तांची संख्या : ४५३१
- ऑनलाईन नोंदविलेल्या फेरफार संख्या : १२१३२
- ऑनलाईन निर्गत फेरफारची संख्या : १००६३
- नोटीस तयार केलेल्या फेरफारची संख्या : ११०१३
- तलाठी स्तरावरून अभिलेख वितरण प्रणालीतून वितरीत सातबारा व खाते उतारे : २,८६,५८०
- पीक कर्जासाठी बँकांनी घेतलेल्या ऑनलाईन ७/१२ व खाते उतारेची संख्या : १० हजार
- पीक विमा योजनेसाठी वापरलेल्या सातबाराची संख्या : १ लाख ३४ हजार
- भूलेखवरून विनाशुल्क / मोफत मिळविलेल्या सातबारा संख्या : ५ लाख २ हजार