पुणे : सौरउर्जा संबंधित प्रकल्प मिळवून देण्याचे आमिषाने पुण्यातील महिलेची ३० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करणाºया आरोपीस कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. आरोपीने याप्रकारे जालना, अमरावती तसेच हैद्राबाद येथील नागरिकांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. राहुल करम सिंग (वय ४३, रा. रविराज आर्याना सोसायटी, साईनाथनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी श्वेता बाणोडे उर्फ श्वेता राहूल सिंग (गोल्ड जीमजवळ, हडपसर) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आाहे. याबाबत श्वेता नेमळेकर (वय ३३, रा. साईराम बंगला, भवानी पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या उच्चशिक्षित आहेत तसेच त्या नोकरीच्या शोधात होत्या. आरोपी राहुल सिंग आणि फिर्यादी महिलेची २०१६ मध्ये भेट झाली होती. आरोपीने हैद्राबाद येथे माझी कंपनी असून आय.बी.एम. आणि एस.टी.पी.आय. भारत सरकार यांच्याबरोबर भागीदारी असल्याची माहिती दिली. फिर्यादींना सौरउर्जा संबंधित प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखविले तसेच फिर्यादींना परदेशात दोन कंपन्या रजिस्टर करायला लावल्या. त्यानंतर फिर्यादीसह त्यांच्या भागीदारांना त्याच्या कंपनीच्या बँक खात्यात रक्कम जमा करायला लावली आणि ३० लाख ७५ हजारांची फसवणूक केली होती. याप्रकरणी नोव्हेंबर २०१७ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस कर्मचारी विनोद साळुंके यांना आरोपीविषयी माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पार्क पोलिसांनी त्याला पुण्यातून ताब्यात घेतले. आरोपी हा सतत ठिकाणे बदलून राहत होता. त्यामुळे त्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. सिंग याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
सौरऊर्जा संबंधित प्रकल्पाच्या आमिषाने तीस लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 9:00 PM
फिर्यादींना सौरउर्जा संबंधित प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखविले तसेच फिर्यादींना परदेशात दोन कंपन्या रजिस्टर करायला लावल्या. त्यानंतर फिर्यादीसह त्यांच्या भागीदारांना त्याच्या कंपनीच्या बँक खात्यात रक्कम जमा करायला लावली.
ठळक मुद्देयाप्रकरणी आरोपीवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल