पिंपरी : पतेती आणि रक्षाबंधनानिमित्त सोडण्यात आलेल्या जादा बसेसमुळे पीएमपीएला दोन दिवसात सुमारे ३० लाखांच्या घरात वाढीव उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न पिंपरीतून मिळाले आहे. दरवर्षा प्रमाणे पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकासांठी पतेती आणि रक्षाबंधनानिमित्त १०३ जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांच्या साप्ताहीक सुट्या रद्द करण्यात आल्यामुळे शहरातील सर्व थांब्यावर दर पाच मिनीटाला पीएमपीएल बस प्रवाशांना उपलब्ध होत होती. याचा परिणाम पिंपरी-चिंचवड मधील पीएमपीएलच्या पिंपरी,निगडी आणि भोसरी या तीन विभागातून दोन दिवसात सुमारे पीएमपीएला २५ लाखांच्या घरात वाढीव उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये पिंपरी विभागाचे दैंनदिन उत्पन्न १२ लाखांचे असताना पतेतीच्या दिवशी १७ लाखांपर्यंत उत्पन्न गेले. तर रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री एकपर्यंत बस धावणार असल्याने २० लाखांच्या घरात हे उत्पन्न जाण्याचाची शक्यता असल्याचे आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांनी सांगितले. तर निगडी विभागाचे दैनंदिन उत्पन्न १३ लाखांचे असून पतेतीला शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे केवळ एकच लाखांचे उत्पन्न मिळाले असल्याचे आगार व्यवस्थापक राजेश रूपनवार यांनी सांगितले. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळपासूनच निगडीहून पुण्याला, हडपसर, विश्रांतवाडी,कात्रज या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती. गर्दीचे प्रमाण लक्षात घेता दर दहामिनिटाला या मार्गावरून पीएमपीएल बस सोडण्यात येत होती. रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री एकपर्यंत बस धावणार असल्याने सुमारे २० लाखांच्या घरात उत्पन्न मिळणार असल्याची माहितीही रूपनवार यांनी दिली. दरम्यान,या तीन्ही विभागातून हे वाढीव उत्पन्न निव्वळ तिकीटांचे असून, सवलत पासमुळे हे उत्पन्न अधिक वाढणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दोन दिवसांत ३० लाखांचे उत्पन्न
By admin | Published: August 19, 2016 6:12 AM