लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रस्त्यावरून जाणारे पादचारी, मंडईत गर्दीचा गैरफायदा घेऊन लोकांचे मोबाईल चोरून नेणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने पकडले असून त्यांच्याकडून १८ गुन्ह्यातील ३० मोबाईल जप्त केले आहेत. इम्रान ऊर्फ लखन मुनिरुजामल मंडल (वय २८, रा. हगवणेवस्ती, इंदिरानगर, बिबवेवाडी, मूळ पश्चिम बंगाल) त्याचा साथीदार काल्या ऊर्फ शामा धोत्रे (रा. बुधवार पेठ) आणि दुकानदार शाहरुख महंमद शेख (वय १९, रा. कात्रज कोंढवा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
युनिट-१ चे अंमलदार योगेश जगताप व प्रशांत गायकवाड यांना बसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरणारा इम्रान फोन विकण्यासाठी महापालिकेजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शामा धोत्रेबरोबर मोबाईल चोरल्याचे कबुल केले. दोघांकडून एकूण ३ लाख ११ हजार रुपयांचे २६ मोबाईल हस्तगत केले. त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल विकत घेणारा दुकानदार शाहरुख शेख यालाही अटक करण्यात आली असून त्यांना ११ फेब्रवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
तसेच बसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरणारा अभिषेक मुन्नालाल कसोटे (वय २१, रा. सर्वेादय कॉलनी, मुंढवा) यांला रास्ता पेठेतील पॉवर हाऊसजवळ मोबाईल विकण्यासाठी आला असता पकडले. त्याच्या कडून ४ मोबाईल असा ५१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ च्या पथकाने ही कामगिरी केली.
फोटो आहे