पुणे : फायनान्स कंपनीचे आॅफिस सुरु करुन कर्ज देण्याचा बहाणा करुन ३० जणांची फसवणूक केल्याचा प्रकार वानवडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी देवर फायनान्सच्या विश्वराज जयदेव देवर (रा. कडनगर, उंड्री) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी राजू निवृत्ती थोरात (वय ५१, रा. भिमनगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, विश्वराज देवर हा मुळचा तामिळनाडुतील मदुराई येथील राहणारा आहे. त्याने सुपर मॉल येथील इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये देवर याने 'देवर फायनान्स' या नावाने जुलै २०२० मध्ये कार्यालय सुरु केले. तेथे त्याने लोकांना कर्ज मिळवून तो असे सांगण्यास सुरुवात केली. थोरात यांची पत्नी, सून व इतरांना त्याने प्रत्येकी २ लाख रुपये कर्ज मिळवून देतो, असा बहाणा केला. त्यांच्याकडून कर्जासाठी लागणाऱ्या प्रोसेसिंग फी म्हणून प्रत्येकी १३ हजार रुपये घेतले.अशा प्रकारे आतापर्यंत ३० जणांकडून ४ लाख रुपयांहून अधिक रक्कम गोळा केली. मात्र, दोन महिन्यांहून अधिक काळ गेला तरी एकालाही त्याने कर्ज मिळवून दिले नाही. त्यामुळे आपली फसवणुक करीत असल्याचे लक्षात आल्यावर लोकांनी वानवडी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याचे कार्यालय पोलिसांनी सील केले आहे.देवर याने आतापर्यंत अनेकांची फसवणूक केली असून आणखी लोक तक्रार देण्यासाठी येत आहे. विश्वराज देवर याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे अधिक तपास करीत आहेत.