पिंपरी : मेट्रो प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी ‘एक पुणेविद्यार्थी पास’ कार्ड सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार (दि. ६) पासून विद्यार्थ्यांना हे कार्ड दिले जाणार आहे. कार्ड घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेट्रो तिकीटात ३० टक्के सवलत दिली जाणार आहे.
पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही विस्तारित मेट्रो मार्गिकेचे १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन उद्घाटन केले होते. जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रोतून प्रवास करावा यासाठी प्रशासनाकडून विविध सवलती दिल्या जात आहेत. पुणे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार पासून प्रीपेड ‘एक पुणे विद्यर्थी पास’ कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. १३ वर्षापेक्षा अधिक वय असणारे विद्यार्थी हे कार्ड घेवू शकतात. यासाठी महाविद्यालयाचे अधिकृत ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक असेल. तसेच या कार्डची वैधता ३ वर्षे असणार आहे. हे बहुउद्देशीय कार्ड असून ते मेट्रो प्रवासा बरोबरच भारतात कुठेही रिटेल पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते. या कार्डद्वारे दोन हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येऊ शकतात. या कार्डला दिवसाच्या २० व्यवहारांची मर्यादा असणार आहे. हे कार्ड सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असणार आहे. तसेच पुणे मेट्रोच्या संकेत स्थळावर ई-फॉर्म भरून कार्ड घेवू शकतात.