- नितीन चाैधरी
पुणे : राज्यात रस्ते अपघातांच्या दृष्टीने यंदाचे वर्ष अतिशय वाईट ठरले असून, गेल्या दहा महिन्यांत तब्बल ३० हजारांहून अधिक वाहनांचा अपघात झाला. त्यात ६६ हजारांहून अधिक गंभीर झाले आहेत. १०८ या आपत्कालीन क्रमांकावर आलेल्या वर्दीतून ही गंभीर आकडेवारी समोर आली आहे. कोरोना काळाची दोन वर्षे वगळता, त्यापूर्वीच्या वर्षांशी तुलना करता २०२२ मध्ये गंभीर जखमींचे प्रमाण २० पटींहून अधिक वाढले आहे. याचे मुख्य कारण चालकांचा निष्काळजीपणा हाच आहे, असे दिसून येत आहे.
पुण्यात रविवारी नवले पुलावर झालेल्या अपघातात भरधाव ट्रकने तब्बल ४८ वाहनांना उडवले. त्यात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर रस्ते अपघातांमध्ये १०८ रुग्णवाहिकेचा रिस्पॉन्स टाईम किती आहे, याविषयी चर्चा सुरू झाली. सुदैवाने या अपघातात गंभीर जखमींचे प्रमाण कमी होते. मात्र, चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या अपघातानंतर १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिकेसाठी आलेल्या फोननंतर तेथील अपघातग्रस्तांना ११ मिनिटांत जवळील रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते.
आपत्कालीन रुग्णवाहिका ९३७ :
राज्यात १०८ ही आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा आहे. महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या माध्यमातून बीव्हीजी रुग्णांना सेवा पुरवते. यासाठी राज्यभरात ९३७ रुग्णवाहिका तैनात आहेत. प्रत्येक रुग्णवाहिकेत डॉक्टरांची उपलब्धता असते. गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतच प्राथमिक उपचार देऊन आवश्यकतेनुसार त्यांना रुग्णालयांत भरती केले जाते. या हेल्पलाइनवर आलेल्या वर्दीवरून राज्यात रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर पोचली आहे.
आकडे बाेलतात...
- जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत राज्यामध्ये तब्बल ३० हजार ५५२ वाहनांचा अपघात झाला. - या अपघातात सुमारे ६५ हजार ९२२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
- सन २०२१ मध्ये ४७ हजार ३०२ वाहनांचे अपघात झाले असले तरी गंभीर जखमींची संख्या केवळ २,९७८ होती.
- त्यापूर्वीच्या पाच वर्षांमध्येही हे प्रमाण कमीच होते. त्यामुळे २०२२ हे वर्ष अपघातांचे वर्ष ठरले.
पुणे जिल्ह्यातही वाढले अपघात :
राज्यात अपघात वाढले आहेत. पुणे जिल्हाही त्याला अपवाद नसून, दहा महिन्यांमध्ये १७८७ वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यात गंभीर जखमींची संख्या तब्बल ५ हजार ५६७ इतकी आहे. सन २०२१ मध्ये गंभीर जखमींची सख्या केवळ २३१ होती. यंदा तब्बल २५ पट वाढ झाली आहे.
...म्हणून हाेताहेत अपघात!
बीव्हीजी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर शेळके म्हणाले की, राज्यात सर्वत्र रस्त्यांची स्थिती चांगली झाल्याने वेगाचा आलेख वाढला आहे. तसेच चालकांचा निष्काळजीपणा देखील वाढला आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातग्रस्त वाहनांमध्ये मोठ्या बसगाड्यांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळेच जखमींची संख्या वाढली. त्यासाठी चालकांना वाहन परवाना देतानाच त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळोवेळी आम्हीही पुढाकार घेत असतो. चालकांमध्ये जागृतीची मोठी गरज आहे.
राज्यातील अपघात
वर्ष -अपघातग्रस्त वाहने- गंभीर जखमी
२०१७- ७४,११८- १४४१
२०१८- ७४,४४७- १३२५
२०१९- ५९,०१२- ६४६
२०२०- ३६,९८६- २०९
२०२१- ४७,३०२- २९७८
२०२२- (ऑक्टो) ३०,५५२- ६५,९२२
पुणे जिल्हा
२०१७ ४,९६९ १०४
२०१८ ५,३१० ९७
२०१९ ४,५७५ ७८
२०२० २,४८६ १८
२०२१ ३,३११ २३१
२०२२ १,७८७ ५५६७
१०८ रुग्णवाहिका
राज्य : ९३७
पुणे जिल्हा : ८२
पुणे, पिंपरी : ४१