शिरूर मतदारसंघातील प्रकल्पासाठी ३० हजार कोटी : डॉ. अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 08:58 PM2023-08-18T20:58:30+5:302023-08-18T20:59:29+5:30
ओतूर-पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गटातील साडेनऊ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते...
ओतूर (पुणे) : पाच वर्षांमध्ये दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळतो हा पुरस्कार माझा नसून प्रत्येक मायबाप जनतेचा आहे, याचे कारण हे की शरद पवारसाहेब यांचे मार्गदर्शन. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण ३० हजार कोटी रुपयांची कामे मार्गी लावण्यात आपल्याला यश लाभले आहे, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. ओतूर-पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गटातील साडेनऊ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
पुणे - नाशिक रेल्वेमार्ग प्रस्तावाचे काम केंद्रातील एका अखेरच्या सहीची गरज पूर्ण झाल्यावर पूर्णत्वास जात आहे. नगर - कल्याण हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण व्हावा म्हणून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव झेपावला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कल्याण - नगर (माळशेज रेल्वे) मार्ग होण्याकामी जोरदार पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही खासदार डॉ. कोल्हे यांनी दिली.
शिवभूमी जुन्नरचे आमदार अतुल बेनके म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेब व अजित पवार हे दोन्हीही आमचे नेते आहेत. सद्यस्थितीत यंदा जुन्नर तालुक्यात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी धरणांमधील पाणीसाठा हा फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच राखून ठेवणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांनी प्रास्ताविकात मार्गी लावलेली विकासकामे व अपेक्षित विकासकामे यांचा पाढा वाचून दाखविला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, बाजार समितीचे सभापती संजय काळे, बाजार समिती संचालक तुषार थोरात, माजी पंचायत समिती सभापती विशाल तांबे, गजानन महाराज संस्थेचे सचिव वैभव तांबे, ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा समनव्यक संभाजी तांबे, ज्येष्ठ नेते विनायक तांबे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, बबन तांबे, सरपंच प्रशांत डुंबरे, माजी उपसरपंच प्रेमानंद अस्वार, उद्योजक जालिंदर पानसरे, अनुराग फापाळे, सोनल डुंबरे, प्रमोद ढमाले, सुदाम घोलप, ईश्वर केदारी, सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे उपस्थित होते.