पुणे : विमान प्रवास हा अनेकांच्या आयुष्यातील कुतूहलाचा विषय असतो. पहिला विमान प्रवास हादेखील मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असतो. पुणे विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवेसह आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होत असल्याने, दररोज ३० हजार पुणेकर विमानाने प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दरराेज १८० ते १८६ विमानांची उड्डाणे हाेत असतात. येत्या काळात अन्य काही ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालीदेखील विमानतळ प्रशासनाकडून सुरू आहेत. शहरात ५ फेब्रुवारी राेजी ९४ विमानांतून १५ हजार ७७ प्रवासी आले, तर पुण्यातून ९४ विमानांमधून १५ हजार १७ प्रवासी शहराबाहेर प्रवासासाठी गेले. एकूण १८६ विमानांमधून ३० हजार ०४ पुणेकरांनी हवाई प्रवास केला. पुणे विमानतळाशेजारी उभारण्यात आलेल्या नव्या टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात असून, ते काम लवकरात लवकर पूर्ण करून नवीन टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करावे, अशी मागणीदेखील करण्यात येत आहे.
कर्नाटकला २ नवीन उड्डाणे...
प्रवाशांच्या मागणीनुसार, पुणे विमानतळ प्रशासनाने कर्नाटकातील हुबळी येथे प्रवाशांना जाण्यासाठी दोन नवीन उड्डाणे सुरू केली आहेत. ही उड्डाणे शनिवारी आणि रविवारी म्हणजेच आठवड्यातून दाेनदा होणार आहेत. इंडिगो एअरलाइन्सतर्फे ही सेवा पुरविण्यात येत आहे.