पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. राज्यभरातून पाचवीच्या १६ हजार ५९३ तर आठवीच्या १३ हजार ७५९ अशा एकूण ३० हजार ३५२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ५ वीचा निकाल २२.९७, तर ८ वीचा निकाल १२.५७ टक्के इतका लागला आहे.महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी २०१८ रोजी ५ वी व ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली होती. इयत्ता ५ वीमधून ४ लाख ८८ हजार ८५१ तर ८ वीमधून ३ लाख ७० हजार २४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५ वीमधून १ लाख ८ हजार ५६० विद्यार्थी तर ८ वीमधून ४५ हजार १०३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत, अशी माहिती महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली आहे.महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवत्ता यादी, शाळांची जिल्हा व तालुकानिहाय सांख्यिकी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटआॅफ शेकडा गुणांइतके गुण मिळूनही निकषांची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होऊ शकलेला नाही. त्याचबरोबर विहीत वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. गुणवत्तायादी तयार करताना रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात आले आहेत, त्यानुसार गुणवत्तायादी तयार करण्यात आली आहे.तात्पुरता निकाल २१ जून २०१८ रोजी जाहीर करण्यात आला होता. २१ जून ते १० जुलै या कालावधीमध्ये गुणपडताळणीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन शाळांना करण्यात आले होते. त्यानुसार शाळांकडून आलेल्या अर्जांची छाननी करून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे, असे सुखदेव डेरे यांनी स्पष्ट केले आहे.>१ सप्टेंबरपर्यंत मिळणार प्रमाणपत्रेशिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रक/प्रमाणपत्र यांच्या छापील प्रती गटशिक्षणाधिकाºयांमार्फत सर्व शाळांना १ सप्टेंबर २०१८ पर्यंत उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती महाराष्टÑराज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे.
राज्यभरातून ३० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:25 AM