नारायणगाव : गिफ्ट व्हाऊचरचे आमिष दाखवून एका तरुणाची एक लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी अनंतारा हॉस्पिटॅलिटी व रेड सीजन हॉलिडे कंपनीच्या डायरेक्टरसह पाच एजंटांना अटक केली आहे. या सर्वांना जुन्नर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
अनंतारा हॉस्पिटॅलिटी व रेड सीजन हॉलिडे कंपनीचे डायरेक्टर व एजंट अफताफ इरफान पठाण, श्वेता विरेंद्रकुमार जैस्वाल, स्नेहल विरेंद्रकुमार जैस्वाल, संदीप रमेश गुप्ता, विजय चंद्रपाल मेबाती (सर्व रा. मुंबई) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याविषयीची फिर्याद विशाल बबन सस्ते (वय २७, रा. कोळवाडी, मढ ता. जुन्नर) यांनी दिली आहे.
याबाबत ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल सस्ते यांच्याशी दि. २८ एप्रिल २०२२ ते १३ ऑगस्ट २०२२ यादरम्यान नारायणगाव येथील हॉटेल टकसन येथून मोबाईलद्वारे संपर्क साधून ‘आम्ही अनंतारा हॉस्पिटॅलिटी कंपनीचे व रेड सीजन हॉलिडे कंपनीचे एजंट आहोत. तुम्हाला आमच्या कंपनीकडून गिफ्ट व्हाऊचर भेट देणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला भारतात कमी किमतीत हॉलिडे तिकीट, गणपतीची चांदीची मूर्ती आणि किचन आर्टिकल आदी भेट देणार आहोत’, असे सांगून विशाल सस्ते यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ४० हजार रुपये रोख व ६० हजार रुपये क्रेडिट कार्डद्वारे असे एक लाख रुपये घेतले. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे या कंपनीने सस्ते तसेच इतर लोकांची आर्थिक फसवणूक करून त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. याबाबत नारायणगाव पोलिसांनी या संशयित आरोपींना हॉटेल टकसन येथून ताब्यात घेत अटक केली. यामध्ये जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सुमारे ३० ते ४० जणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांकडून अशा पद्धतीने विविध आमिषे देऊन पैसे घेतले असल्यास त्यांनी नारायणगाव पोलिसांशी संपर्क करावा.