-
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांना वैद्यकीय पुराव्यावरून न्यायालयाने 30 वर्षे सक्तजुरीची शिक्षा सुनावली.
मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या कोंढवा खुर्द भागात वास्तव्यास असणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीला विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली. याबरोबरच त्याला 15 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. वडिलांनी पोटच्या मुलीसोबत केलेला हा घृणास्पद प्रकार आहे. या प्रकरणात कमी शिक्षा दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी केली.
जून ते ऑक्टोबर 2019 या चार महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडला. विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी यामध्ये 8 साक्षीदार तपासले. वैद्यकीय पुरावा, तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांची साक्ष आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचा नोंदविलेला जबाब महत्त्वाचा ठरला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार सचिन शिंदे, पोलीस शिपाई अंकुश केंगळे यांनी मदत केली.
मुलगी गर्भवती असल्याचेही निष्पन्न झाले. अचानक तिचा गर्भपात झाला. त्यानंतर 10 ऑक्टोबर 219 रोजी त्याने आई शेजारी झोपलेल्या पीडितेशी पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्याने दोघींना मारहाण केली. त्यानंतर दोघींनी जाऊन पोलिसात फिर्याद दिली.
या प्रकरणात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम (पास्को) 4 नुसार 30 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड, 323 (मारहाण) नुसार 1 वर्षे सक्तमजुरी, 506 (धमकाविणे) नुसार सहा महिने सक्तमजुरी, पास्को 8 नुसार 5 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंड, पास्को 12 नुसार 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.