लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या कमांड रुग्णालयाच्या तीनशे खाटा लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली.
कोरोनाची साथ नियंत्रणात येण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, या मागणीचे निवेदन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते आबा बागुल, कमल व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
शहरात दररोज ४ हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. साडेसहाशेहून अधिक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयनिहाय खाटांची उपलब्धता, व्हेटिंलेटर्सची संख्या, जम्बो हॉस्पिटलची सद्यस्थिती, प्लाझ्मा तुटवडा याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती यावेळी कॉंग्रेसने आयुक्तांकडे मागितली.
डॅश बोर्डवर प्रत्येक रुग्णालयात बेड आणि व्हेंटिलेट बेडची संख्या याची माहिती मिळत नाही, टोल फ्री नंबरची लागत नाही, कार्डियॉक रूग्णवाहिका मिळत नाही अशी तक्रारही करण्यात आली. डॉक्टर, परिचारीका, अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पुरेशी व्यवस्था व्हावी, कोविड रुग्णालयासाठी अधिकारी नेमून त्यांचे नाव आणि संपर्क क्रमांक जाहीर करावेत, डायलेसिस कराव्या लागणाऱ्या कोविड बाधितांसाठी स्वतंत्र व्यवस्था व्हावी अशा मागण्या कॉंग्रेसने केल्या. लिफ्ट नसलेल्या रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण तळमजल्यावर करावे ही मागणी आयुक्तांनी मान्य केली. आयुक्तांनी सांगितले की सध्या लसीकरणासाठी १३ हजार वायल उपलब्ध आहेत, पुण्याला २६ लाख वायल मिळावेत अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.