पुणे : देशात मालवाहतूक अधिक जलद होण्यासाठी रेल्वे प्रशासन एनएमजीएच (न्यू मॉडीफाईड गुड्स हायस्पीड) डब्यांचा वापर करणार आहे. पहिल्या टप्प्यात देशात ३०० डब्यांचा वापर केला जाणार आहे. यापैकी १०० डबे मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेत तयार होणार आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत १० डबे तयार केले जातील. यामुळे मालवाहतूक ११० किलेामीटर वेगाने होईल.
रेल्वे आता मालवाहतुकीसाठी आयुर्मान संपलेल्या प्रवासी डब्यांचा वापर करत आहे. यासाठी ते एनएमजी डब्यांचा वापर करत आहेत. मात्र हे डबे ७५ ते ८० किलोमीटर वेगाने धावत आहेत. ह्या डब्यांच्या गतीत वाढ करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न केले जात होते. विविध पातळीवर घेण्यात आलेल्या चाचणी यशस्वी ठरल्यानंतर रेल्वे बोर्डाने एनएमजीएच या वेगाने धावणाऱ्या डब्यांना परवानगी दिली. त्याच्या उत्पादनाला आता सुरुवात होणार आहे.
रेल्वे बोर्डानेदेखील ह्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच एनएमजीएचचे ३०० डबे तयार करण्यास सुरुवात होणार आहे.
चोकट 1
कसे असतात एनएमजीएच कोच :
प्रवासी डब्यांमधील सीट काढून ती जागा मोकळी करुन त्यात दुचाकी, चारचाकी, पार्सलचे सामान ठेवण्यात येते. तसेच खिडक्या व दरवाजे बंद करण्यात आले. एका डब्यातून १५ टन मालाची वाहतूक होते. पूर्वी त्याची क्षमता ९.२ टन इतकी होती. डब्यांमध्ये विजेची व्यवस्था करण्यात आली. दरवाज्यांच्या रचनेतही बदल झाला आहे.