पुणे : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरण देशभरात गाजले होते. या अपघातात विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कार चालवत दोघांना चिरडले होते. त्यानंतर आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला शिक्षा म्हणून ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगितला होता. तसेच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सोबत काम करण्याच्या अटी शर्तीवर जामीन दिला होता. यानंतर माध्यमांमध्ये हे प्रकरण चांगलेच गाजले. बाल न्याय मंडळाच्या या निणर्यामुळे पुणे पोलिसांचीही मोठी नाचक्की झाली होती. एवढा मोठा अपघात होऊनही पोलिसांनी चुप्पी ठेवल्याने पोलिसांवर टीकाही झाली होती. त्यानंतर पोलिसांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तिथे निर्णय देताना उच्च न्यायालयाने बाल न्याय मंडळाची शिक्षा कायम ठेवत पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
शिक्षेची अंलबजावणी-
आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. उच्च न्यायालयाने बाल न्याय मंडळाची शिक्षा कायम ठेवायला सांगितली होती. त्याप्रमाणे त्या अल्पवयीन आरोपीने ३०० शब्दांचा निबंध कोर्टासमोर प्रस्तूत केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच समुपदेशन आणि वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सोबत काम करणे यासारख्या इतर अटींचे पालन करण्यासाठी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे, अशीही माहिती समोर येतेय.
कल्याणीनगर येथे १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून दुचाकीस्वार सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यामध्ये या तरुण-तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. मुलाला १५ तासांत जामीन देण्यात होता. यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सत्र न्यायालयात अर्ज करून अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजावे, यासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने पुणे पोलिसांना परत बाल न्याय मंडळात अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार पुणे पोलिसांनी मंडळात अर्ज केला असता अल्पवयीन मुलाला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
बदललेले रक्त फेकले बायोलॉजिकल वेस्टमध्ये :
अपघात झाल्यानंतर वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मुलाची अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह यावी यासाठी ससूनमधील डॉक्टरांच्या मदतीने शिवानी अग्रवाल यांचे रक्त घेण्यात आले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अल्पवयीन मुलाचे रक्त हे बायो मेडिकल वेस्टमध्ये फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे.
विशाल अग्रवालनेच दिले ते पैसे :
अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याला आरोपी अश्फाक मकानदार याने येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या परिसरात तीन लाख रुपये दिले होते. घटकांबळे याने यातील अडीच लाख रुपये डॉ. श्रीहरी हाळनोर आणि स्वतःकडे ५० हजार ठेऊन घेतले होते. डॉक्टरांना देण्यात आलेले तीन लाख रुपये विशाल अग्रवाल याने कल्याणीनगर येथील एका हॉटेलमध्ये अश्फाक मकानदार याला दिल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.