पुणे : नववर्षांच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरला पुणेपोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्याअनुषंगाने सर्वच पोलीस ठाण्यातंर्गत बंदोबस्त तैनात केला असून, शहरभरात ३ हजारांवर पोलीस अमलदारांसह अधिकारी दक्ष राहणार आहेत. त्यासोबत ८०० वाहतूक अमलदार, अधिकारी तैनात केले आहेत. प्रामुख्याने शहरभरातील २७ महत्वाच्या ठिकाणांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह पॉइंट केले आहेत. त्यानुसार बेशिस्त वाहन चालक, मद्यपी चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाईसह प्रसंगी वाहन जप्तीचीही कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
अमितेश कुमार म्हणाले, राज्य शासनाच्या आदेशानुसार पोलिसांकडून विविध नियमांची अमलंबजावणी केली जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर हॉटेल पब, बार मालकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अल्पवयीनींना मद्याची विक्री न करणे, वेळेचे बंधन पाळणे महत्वाचे आहे. तसेच पबमधील संगीताचा आवाज इतरांना त्रासदायक ठरणार नाही, याचीही संबंधितांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हॉटेल व्यावसायिकांनीही दक्षता घ्यावी. दरम्यान, खासगी पार्ट्यासह स्थानिकांनी शाळा, महाविद्यालय हॉस्टेल, रूग्णालय परिसरात मुझ्यिकच्या आवाजाची मर्यादा बाळगणे बंधनकारक आहे.
महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता वाहनांसाठी बंद...
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी पाच नंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अराेरा टाॅवर्स चौकदरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.