पुणे : पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळीस्थिती असल्याने रब्बीची कामे आटली आहेत. त्यामुळे रोजगार हमीकडे ग्रामीण भागातील नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे. नोव्हेंबर महिना अखेरीसच पुणे विभागात १ हजार ८७६ कामे सुरु झाली असून, तब्बल ३१ हजार १४१ हाताला काम मिळाले आहे. रोजगार हमीवर काम करणारी निम्म्या व्यक्ती तीव्र दुष्काळाचा सामना करत असलेल्या सातारा जिल्ह्यातील आहेत. राज्य सरकारने दुष्काळसदृश्य स्थिती असलेले तसेच मध्यम आणि तीव्रतेच्या निकषानुसार दुष्काळग्रस्त वाड्या आणि गावे जाहीर केली आहेत. त्यानुसार पुणे विभागातील ११ हजार ४०१ गावे आणि वाड्यांचा टंचाई आराखडाही विभागीय आयुक्तालयाने तयार केला आहे. पुणे विभागातील पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असलेल्या जिल्ह्यात कोल्हापूर, सातारा हे जिल्हे आघाडीवर आहे. पुणे जिल्ह्यातील डोंगरी भाग वगळता बारामती आणि शिरुर सारखे तालुक्यातही टंचाई आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ४१७ कामे सुरु असून, त्यावर १,७६७ मजूर कामी करीत आहे. तर, इतर कामांची संख्या ८२ असून, मजुरांची संख्या ५८८ आहे. अशी ४९९ कामे सुरु असून, मजुरांची संख्या २ हजार ३५५ आहे. विभागात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ५३९ कामे सुरु असून, त्यावर तब्बल १७ हजार ४१७ मजुर काम करीत आहेत. त्यात ग्रामपंचायत स्तरावर ४१३ कामे सुरु असून, त्यावर १२ हजार २०१ मजुर काम करीत आहेत. तर, इतर ठिकाणच्या १२६ कामांवर ५ हजार २१६ जणांना काम मिळाले आहे. कोल्हापूरात ग्रामपंचायतस्तरावर २३७ आणि इतर ठिकाणी २५ अशी २६२ कामे सुरु आहेत. त्यावर अनुक्रमे ४ हजार १४३ आणि ७८८ अशी ४ हजार ९३१ जणांना काम मिळाले आहे. सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर १२८ आणि इतर ठिकाणी ९१ अशा २१९ कामांवर ९ हजार ९३८ जण मजुरी करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यात आवर्षणाची स्थिती असली तरी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने दुष्काळाची तीव्रता कमी आहे. येथे ३५७ कामे सुरु असून, त्यावर दीड हजार मजुर काम करीत आहेत. --------------- पुणे विभागात ग्रामपंचायत स्तरावर १ हजार ४४७ कामे सुरु असून, त्यावर २२ हजार ७२८ मजुर काम करीत आहेत. तर, इतर ठिकाणी ४२९ कामे सुरु आहेत. त्यावर ८ हजार ४१३ मजुर कामास आहेत.
पुणे विभागात दुष्काळातही ३१ हजार हातांना ‘रोजगाराची हमी’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 12:03 PM
राज्य सरकारने दुष्काळसदृश्य स्थिती असलेले तसेच मध्यम आणि तीव्रतेच्या निकषानुसार दुष्काळग्रस्त वाड्या आणि गावे जाहीर केली आहेत.
ठळक मुद्देपुणे विभागातील स्थिती : जिल्ह्यात ४९९, तर विभागात सातारा जिल्ह्यात ५३९ कामे सुरुपुणे विभागात ग्रामपंचायत स्तरावर १ हजार ४४७ कामे सुरु विभागातील ११ हजार ४०१ गावे आणि वाड्यांचा टंचाई आराखडा तयार