लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात पुणे शहरातून तब्बल ३१२ अल्पवयीन मुली या घरातून न सांगता निघून गेल्या होत्या. त्याबाबत पोलिसांनी ३६३ कलमाखाली गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेतला असता त्यापैकी ३१२ अल्पवयीन मुली मिळून आल्या आहेत. ९३ मुली अद्याप बेपत्ता आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १८ वर्षांच्या खालील मुली, मुले घरातून निघून गेले असले तरी त्यांचे अपहरण झाले असे गृहीत धरून तपास करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच पुण्यातून घरातून निघून गेलेल्या १४ वर्षांच्या मुलीचा शोध घेत असताना तिच्यावर १३ जणांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला.
अल्पवयीन मुली पळून जाण्यामागे प्रामुख्याने घरातील लोकांशी होत असलेला वाद, प्रेमसंबंधांना होणारा विरोध आणि तारुण्यसुलभ आकर्षक ही कारणे दिसून येतात. त्यातील अनेक मुली या स्वत: काही दिवसांनी घरी परत येतात. तर काही जणी या आम्ही सुखरुप असल्याचे घरच्यांना कळवितात. अनेकदा ही बाब नंतर घरातील व्यक्ती पोलिसांना कळवत नाही. अनेकदा मुलगी घरातून निघून गेल्यानंतर ती कोणाबरोबर गेली असावी, याचा अंदाज घरातील लोकांना असतो. मात्र, आपली बदनामी होईल, या भीतीने लोक पोलिसांना संपूर्ण माहिती देत नाही. संबंधित मुलीचे मैत्र-मैत्रिणीही आपल्यावर येईल, या भीतीने पोलिसांपासून माहिती लपवितात. त्यामुळे अशा बेपत्ता मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना अनेकदा खूप अडचणी येतात, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्र्यांनी दिली.
वर्ष एकूण बेपत्ता बेपत्ता मुली मिळून आलेल्या मुली अद्याप बेपत्ता
२०१८ ५३६ ४३० ४२२ ८
२०१९ ६३९ ४६३ ३८४ ७९
२०२० ४१९ ३३८ २३२ १०६
२०२१ ३६७ ३१२ २१९ ९३
जुलैअखेर