भीमाशंकर : जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, शिवनेरी व इंदापूर तालुक्यातील मौजे गंगावळण येथील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ३१७.३६ लक्ष रूपये निधी दिला आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासासाठी २७२.३६ लक्ष रुपये मागण्यात आले होते. ही सर्व रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे. यामधून राजपूर येथे बांधण्यात येत असलेल्या भक्तनिवास परिसरात विविध सुधारणा करण्याच्या कामासाठी १९२.५९ लक्ष रूपये, भीमाशंकर बसस्थानक आवारात सुधारणा करणे ४७.९९ लक्ष, पिण्याच्या पाण्यासाठी एक लक्ष लिटरची टाकी बांधणे या कामास ३१.७८ लक्ष रूपये देण्यात आले आहेत. शिवनेरी किल्ला व परिसर सुशोभीकरण कामामधील किल्ले शिवनेरी येथील गार्डन क्र.५ मध्ये पॅगोडा बांधणे या कामासाठी २५ लक्ष रूपये देण्यात आले आहेत. इंदापुर तालुक्यातील गंगावळण येथील पर्यटन विकास करण्यासाठी २० लक्ष रूपये देण्यात आले आहेत. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दि.४ जानेवारी रोजी काढलेल्या शासन आदेशात जिल्हाधिकारी यांना निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. (वार्ताहर) श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नुकतीच राज्याचे सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी निधीअभावी भीमाशंकरचे भक्तनिवास सुरू होत नसून १.९२ कोटी रूपये मिळाल्यास पुढील तीन महिन्यात हे भक्तनिवास भाविकांसाठी सुरू करता येईल असे निदर्शनास आणून दिले. तसेच यासह इतर काही कामांना आवश्यक असलेल्या निधी द्यावा अशी मागणी केली होती. ४या पाहणी दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले होते.
जिल्ह्यातील तीन पर्यटनस्थळांना ३१७.३६ लाखांचा निधी
By admin | Published: January 11, 2017 1:51 AM