किरण शिंदे
पुणे : ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेला जबरदस्ती करण्यात आली. इतकेच नाही तर या महिलेला एका घरात डांबून ठेवत तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केले. हा संपूर्ण प्रकार विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील माधवनगर धानोरी इथे घडला. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. ३२ वर्षीय पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
संतोष रामदास गायकवाड (वय-५५ वर्षे, रा. विठ्ठल मंदिराचे समोर, धानोरी, पुणे), महिला नामे घोडके (वय-३० वर्षे, रा. सदर) आणि सागर मधुकर लांडगे (वय-३० वर्षे रा. गल्ली नं.३, माधवनगर, धानोरी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील तिन्ही आरोपींनी पीडित महिलेला धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहित करून धानोरी परिसरात बोलावले. आरोपी महिलेच्या धानोरी येथील घरात संतोष गायकवाड आणि सागर लांडगे यांनी डांबून ठेवले. इतकेच नाही तर दोघांनीही पीडितेच्या डोक्याला बंदूक लावत ठार मारण्याची धमकी दिली आणि आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. अत्याचार करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी सागर लांडगे यांनी लोहगाव परिसरात घेऊन जात एका खोलीमध्ये ठेवले. आणि दरम्यानच्या काळात पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाही तर तिन्ही आरोपींनी पीडित महिलेच्या घरातील देवांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी तक्रार आल्यानंतर विमानतळ पोलिसांनी कलम - ५१/२०२५ भा.द.वि. कलम ३७६ (२).३४१, ३४३,२९५(अ), ३२३. ५०४, ५०६, ५०६(२), ३४ आर्म अॅक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.