इंदापूर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, युवा कार्यकर्ते वसीम बागवान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
गारटकर म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून, इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी डीपीडीसीमधून निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला आहे. तसेच दलित वस्तीसाठी निधी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातून निधी, दलितोत्तर विकास निधी, तसेच नगरोत्थान योजनेतून इंदापूर शहरात निधी मिळतो आहे. याच निधीच्या माध्यमातून इंदापूर शहरात राहिलेल्या विविध विकासकामांचा बॅकलॉग भरून निघणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, अद्ययावत ड्रेनेज व्यवस्था, विद्युत वाहिनीचे अंतर्गत काम, टाऊन हॉलचे काम सुशोभीकरण, बागेतील सुखसुविधा अशी विविध विकासकामे या निधीतून केली जाणार आहेत. नवीन रस्ते, रिंग रोड करण्यासाठी हा निधी प्राधान्याने वापरला जाईल.
इंदापूर नगरपरिषदेच्या सत्तेत आम्ही असताना, शहराच्या विकासासाठी निधी आणताना मर्यादा असायच्या. त्यामुळे त्याकाळी निधी मिळत नव्हता. नंतरच्या कालावधीमध्ये विरोधकांच्या हाती नगरपरिषदेची सत्ता असल्यामुळे, शहराच्या विकासासाठी इतका निधी कधीही इतिहासात आलेला नाही. त्यामुळे शहराच्या विकासकामांना मोठी चालना मिळणार आहे. येणाऱ्या काळातदेखील मोठ्या प्रमाणात शहरातील विकासकामांसाठी निधी खेचून आणला जाईल. यामध्ये अद्ययावत नाट्यगृह, भूमिगत गटारे, भूमिगत वीजवाहिन्या व वाढीव हद्दीतील सर्व कामे, वेगाने करण्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. जवळपास वाढीव हद्दीतील उपेक्षित कामे ३० वर्षांपासून रखडलेली आहेत. शहरातील युवकांचे, तरुणांचे, वृद्ध लोकांचे, आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी अद्ययावत क्रीडांगण, स्विमिंग टॅंक, खेळाची विविध मैदाने, निर्माण केली जाणार आहेत. नगर परिषदेमध्ये सत्ता नसताना इतका निधी विकासकामांसाठी शहरांमध्ये येऊ शकतो. नगर परिषद ताब्यात असल्यानंतर निधीचा महापूर शहराच्या विकासासाठी आणल्याशिवाय राहणार नाही, अशीही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
: इंदापूर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर व मान्यवर.