अवकाळी पावसाने सध्याचा बाजारभावाचा विचार करता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. नारायणगाव, गुंजाळवाडी, वारूळवाडी ,येडगाव, खोडद, मांजरवाडी हा परिसर जुन्नर तालुक्यातील द्राक्ष पट्टा म्हणून ओळखला जातो. १७ गावात ७ जानेवारीला सायंकाळी ६.३० नंतर मुसळधार अवकाळी पाऊस झाला. परिणामी १२ तास द्राक्ष घडात पाणी राहिल्याने द्राक्ष घडातील मण्यांना देठाकडील बाजुने चिरा पडल्या. त्याने निर्यातक्षम द्राक्ष मातीमोल झाली. कृषी अधिकारी प्रमोद बनकर, तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दि.८ जानेवारी रोजी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी केली. त्यानंतर तहसीलदार यांनी नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. या १७ गावांतील १०८६ एकर क्षेत्रातील परिपक्व अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले. गुंजाळवाडी नारायणगाव १२५ हेक्टर, वारुळवाडी ६३ हेक्टर, येडगाव ४३ हेक्टर, पिंपळगाव तर्फे नारायणगाव ३१ हेक्टर या गावातील द्राक्ष बागांचे नुकसान झाले. २५ ऑक्टोबरनंतर छाटणी झालेल्या थिनिंग सुरू असलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान नुकसान कमी झाल्याने त्या बागांचे पंचनामे केले नाहीत. औषधांची फवारणी करून या बागा वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादक प्रयत्न करत आहेत. द्राक्ष घडाभोवती लावलेले संरक्षक कागद पावसाने भिजल्याने दुबार कागद लावण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. औषधांची फवारणी खर्चात एकरी सुमारे ४० हजार रुपयांची वाढ होणार आहे.
.****चौकटीसाठी मजकुर--
द्राक्षबागेला एकरी भांडवली सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च होतो. नुकसान झालेल्या १०८६ एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांचे सुमारे ३८ कोटी रुपयांचा खर्च अंगावर आला आहे. या निर्यातक्षम द्राक्षाचे १०० ते १२५ रुपये प्रतिकिलो दराने करार केले होते. परिणामी शेतकऱ्यांचे १०० ते १३५ कोटींचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची हेक्टरी १८ हजार रुपये दराने शासकीय नियमानुसार भरपाई मिळेल. नुकसान व भरपाई यात मोठी तफावत आहे.