पुणे : नववर्षांच्या स्वागतासाठी शहर आणि जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध पार्ट्यांमधून जिल्हा प्रशासनाला ३३ लाख २३ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. यंदा सुमारे १४४ आयोजकांनी थर्टीफर्स्ट पार्ट्यांसाठी करमणूक कर विभागाची परवानगी घेतली होती. सनबर्न फेस्टिव्हलमध्ये यामुळे मोठी वाढ होण्याची शक्यता असून, सनबर्नच्या वतीने आगाऊ ७७ लाख रुपयांचा कर जिल्हा प्रशासनाकडे जमा केला असल्याची माहिती जिल्हा करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील-चौधरी यांनी दिली.जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात थर्टीफर्स्ट पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यासाठी करमणूक कर विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. शासनाच्या वतीने शहरी भागात एकूण उत्पन्नाच्या २० टक्के, नगरपालिका हद्दीत १५ टक्के आणि ग्रामीण भागात १० टक्के करमणूक कर वसूल करण्यात येतो. जिल्हात यंदा १४४ आयोजकांनी थर्टीफर्स्ट पार्ट्यांसाठी करमणूक कर विभागाची परवानगी घेतली होती. अनधिकृत थर्टीफस्ट पार्ट्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासना मार्फत २७ पथकांची नेमणूक करण्यात आली होती. सनबर्नसाठी नक्की किती तिकीट विक्री झाली याची तपासणी सुरु आहे. त्यानंतर नक्की किती कर जमा होईल हे निश्चित होईल, असे पाटील यांनी सांगितले.
थर्टीफर्स्ट पार्ट्यांमधून ३३ लाखांचा महसूल
By admin | Published: January 04, 2017 5:37 AM