पुणे : जड अवजड वाहनांच्या बेशिस्तीमुळे मागील नऊ महिन्यांत तब्बल ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे यात सर्वाधिक जीव डंपरने घेतले आहेत, अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील मध्य भागाच्या तुलनेत उपनगरात जड वाहतुकीचे प्रमाण जास्त असून शहराबाहेरून येणारे ट्रक तसेच डंपर जात असल्याने त्या डंपरचालकांच्या बेपर्वाईमुळे अपघात घडले आहेत. विमाननगर भाग तसेच पुणे-नगर रस्त्यावर जड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत वाहनांना बंदी घालण्यात आली असून, पोलिसांनी प्रवेशबंदीचे आदेश दिल्यानंतर दिवसा या भागातून वाहतूक करणाऱ्या डंपरचालकांवर विमानतळ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि त्यांच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. प्रवेशबंदीची वेळ झुगारून या भागातून जाणाऱ्या आठ डंपरचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५ लाख ७० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे (नियोजन) यांनी सांगितले. शहरातील गंभीर स्वरूपाच्या अपघातांची संख्या कमी झाली आहे. उपनगरात डंपर, ट्रक अशा जड वाहनांमुळे अपघात झाले असल्याचे निरीक्षण पोलीस निरीक्षक शितोळे यांनी नोंदविले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दिलेले प्रवेशबंदीचे आदेश झुगारून वाहतूक करणाऱ्या डंपर आणि ट्रकचालकांवर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई सुरू आहे. ...............बेशिस्तपणे ट्रक आणि डंपर अशी वाहने चालविणाऱ्या चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. वेगावर नियंत्रण ठेवावे. वेगाची मर्यादा ओलांडल्यानंतर अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करू नये. जास्त क्षमतेचा माल वाहून नेल्यास अपघात होण्याची शक्यता असते. प्रवेशबंदीबाबत पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. नियमभंग करणाºया जड वाहनांवर कारवाई सुरूच राहणार आहे.- शुभदा शितोळे, वाहतूक विभाग, पोलीस निरीक्षक (नियोजन).......
जड वाहनांमुळे झालेले प्राणांतिक अपघातट्रक २१डंपर १२(आकडेवारी सप्टेंबर अखेरपर्यंतची)