जिल्ह्यातील नागरिकांना आता ‘ई-ग्राम’ या प्रणालीमधून घरबसल्या विविध प्रकारचे दाखले उपलब्ध होणार आहेत. पूर्वीची ‘संग्राम’ ही प्रणाली आता बंद केली असून, ग्रामपंचायतीमधून वापरण्यात येणा-या नव्या ई-ग्राम प्रणालीतून १ ते ३३ प्रकारचे दाखले मिळण्याची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७९६ ग्रामपंचायतींमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली असून, उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये लवकरच बसवणार असून, हे दाखले आता घरबसल्या मिळणार आहेत, असे ‘लोकमत’शी बोलताना जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सांगितले.संदीप कोहिणकर म्हणाले, नागरिकांना विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी तसेच ग्रामपंचायतीच्या नोंदी आॅनलाइन करण्यासाठी ई-ग्राम प्रणाली राज्य शासनाने लागू केली आहे. जिल्ह्यात या प्रणालीची प्रभावीपणे ७९६ ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी करत पुणे जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज्यात सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत ई-ग्राम प्रणाली कार्यान्वित करण्यामध्ये पुणे जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यांत मिळून १४०७ पैकी आतापर्यंत ७९६ ग्रामपंचायतींमध्ये प्रणाली कार्यान्वित केली आहे.केंद्र शासनाच्या वतीने सर्व राज्यांतील ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याचे ‘नॅशनल पंचायत पोर्टल’ असे नामकरण करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीची लिंक या पोर्टलवर देण्यात आली आहे. त्या लिंकद्वारे प्रत्येक नागरिकाला ग्रामपंचायतीकडून आकारल्या जाणाºया कराची माहिती पाहायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात १ हजार ४०७ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. तर राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण २९ हजारांहून अधिक ग्रामपंचायती आहेत.सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक नागरिकांकडून आकारले जाणारे कर आता या प्रणालीमुळे एका ‘क्लिक’वर पाहायला मिळणार आहेत. ‘नॅशनल पंचायत पोर्टल’वर देशातील सर्व ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र वेबलिंक कार्यान्वित करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील आतापर्यंत ७९६ ग्रामपंचायतींनी करविषयीची माहिती अद्ययावत केली असल्याचे संदपी कोहिणकर या वेळी म्हणाले.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना विविध कर आकारले जातात. त्यात दिवाबत्ती, पाणीपट्टी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छतेसाठीचे कर आकारले जातात. त्याशिवाय संबंधित गावातील गावठाण, गायरान, औद्योगिक वसाहत, शेती या कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, त्याची कर आकारणी किती आहे, याची माहिती एका ‘क्लिक’वर नागरिकांना पाहता येणार आहे. प्रामुख्याने या वेबपोर्टलवरील आॅनलाइन कराच्या माहितीचा औद्योगिक कंपन्यांना फायदा होणार आहे. कोणत्या गावात अथवा औद्योगिक क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्यापूर्वी त्या ठिकाणी किती कर आकारला जातो याची माहिती कंपन्यांना सहज आॅनलाइन पाहता येणार आहे.‘ई-ग्राम’ प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या दाखल्यांसाठी अर्ज करता येईल. यामध्ये अर्जदार व्यक्तीचे नाव, कागदपत्रे तत्काळ अपलोड केल्यास दाखला मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदाराने प्रणालीमध्ये ‘रजिस्टर’ (नोंद) करावे लागणार आहे.तसेच ‘लॉगिन’ करावे लागेल. दारिद्र्यरेषेखालील दाखले, नमुना ८ अ उतारा, रहिवासी दाखला, जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, शौचालय वापरत असल्याचा दाखला, विभक्त कुटुंब दाखला, विधवा असल्याचा दाखला, ग्रामपंचायतीचे येणे नसल्याचा दाखला, ज्येष्ठ नागरिकांचा दाखला, हयातीचा दाखला, निराधार दाखला अशा विविध प्रकारचे दाखले आता नागरिकांना घरबसल्या ‘ई-ग्राम’ या प्रणालीद्वारे मिळणार आहेत.राज्य शासनाने नुकतीच ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती. त्यामुळे शेतकºयांना कर्जमाफी मिळावी यासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचे काम प्रामुख्याने या केंद्रातून करण्यात आले आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रातून पात्रताधारक शेतकºयांची नोंदणी केली आहे.तसेच यापुढे एसटी बसचे आरक्षण, रेल्वे आरक्षण, देशातंर्गत विमानसेवेचे आरक्षण देण्यासाठीचा प्रयत्नपुढील काळात करण्यात येणार असल्याचे संदीप कोहिणकर यांनी सांगितले.
३३ प्रकारचे दाखले आता घरबसल्या देणार - संदीप कोहिणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:18 AM