जुन्नर (पुणे) : सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून जुन्नर येथील शिया मुस्लिम समाजाच्या मदरसा ट्रस्टच्या पदाधिकार्यांसह एकूण ३४ जणांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याचा हा जुन्नरमधील पहिलाच प्रकार असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणेच्या वतीने जुन्नर पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. जुन्नर येथील शिया मुस्लिम समाजाच्या मदरसा ट्रस्टमध्ये मदतनीस म्हणून काम करणारे हमीदउल हसन सय्यद (वय ३५, रा. सय्यदवाडा, जुन्नर) यांनी याबाबत जुन्नर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. या फिर्यादीप्रमाणे जुन्नर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०६, महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६ चे कलम ३ (१) (२) (४) नुसार एकूण ३४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हमीदुल सय्यद याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शिया समाजाच्या मदरसा ट्रस्टमध्ये जानेवारी २०१५ ते नोव्हेंबर २०१५ या काळात कामकाज करीत असताना मी व्यवस्थित काम करीत नाही, मनानेच काम करतो, कामात पैसे खातो, असे आरोप करण्यात येऊन एप्रिल २०१६मध्ये मला शिया मुस्लिम समाजातून बहिष्कृत केल्याबाबत शिया जामा मशिदीसमोरील पब्लिक नोटीस बोर्डावर नोटीस लावण्यात आली होती. तसेच, आॅक्टोबर २०१६मधील मोहरम अशुरा या मिरवणुकीत असताना कलबेअली सय्यद व मोहमद हमीदसय्यद, शमीम सय्यद यांनी माझ्या हातातून माईक काढून घेऊन धक्काबुक्की करून मिरवणुकीतून हाकलून दिले. मला समाजातून बहिष्कृत केल्याने माझ्या किराणा मालाच्या दुकानामध्ये किराणा घेण्यासाठी कोणी येत नसल्याने माझे आर्थिक नुकसान झाले आहे. समाजातील चाली-रूढी बंद व्हाव्यात तसेच समाजातील इतर कोणावर असा बहिष्कार टाकला जाऊ नये, याकरिता मी फिर्याद दाखल करीत आहे. फिर्यादीनुसार जुन्नर पोलिसांनी समाजातील पंच इस्माईल रोशनअली सय्यद, अध्यक्ष शिया जमात तसेच आमिरअली सय्यद , मोहमद अब्बास सय्यद, मोहमद काझीम सय्यद, सुलतानअली सय्यद, नजीर हुसेन सय्यद, कलबे अब्बास सय्यद, मुराद अब्बास सय्यद, मोहमद तफजुल सय्यद, मोहमद मतीन सय्यद, मोहमद वसीम सय्यद, मोहमद हमीद सय्यद, अदिल अब्बास सय्यद, नौरोज हसन सय्यद, रजा हसन सय्यद, अली नकी सय्यद, मोहमद नबी सय्यद, मोहमद यावर सय्यद, दिलबर मेहंदी सय्यद, नुरे अब्बास सय्यद,नफिस हुसेन सय्यद, सज्जद हुसेन सय्यद,मोहमद जफर सय्यद, मोहमद मुबीन सय्यद, नौशाद अली सय्यद,मोहमद शेर सय्यद, कलबे अली सय्यद, सरकार मेहंदी सय्यद, मोहमद अब्बास सय्यद, समर हैदर सय्यद, दिलावर हुसेन सय्यद, मोहमद सईदअली सय्यद , रहेबर हुसेन सय्यद (सर्व जण रा. सय्यदवाडा, जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हमीदुल सय्यद व त्याची पत्नी व २ मुलांना बहिष्कृत केल्याचे त्याने पोलिसांनकडे सांगितले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शीतल चव्हाण करीत आहेत.
सामाजिक बहिष्कार प्रकरणी शिया मुस्लिम समाजाच्या पदाधिकार्यांसह ३४ जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 6:58 PM
सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून जुन्नर येथील शिया मुस्लिम समाजाच्या मदरसा ट्रस्टच्या पदाधिकार्यांसह एकूण ३४ जणांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देकलम ५०६, बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६चे कलम ३ (१) (२) (४) नुसार ३४ जणांवर गुन्हासामाजिक बहिष्कार टाकला म्हणून गुन्हा दाखल होण्याचा हा जुन्नरमधील पहिलाच प्रकार