पुणे : पुणे जिल्हा सधन असल्याने शासकीय कामात लाचखोरीमध्ये कायमच आघाडीवर राहिला आहे. त्याचबरोबर अशा लाचखोरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या ६ महिन्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३४ सापळा केसेस यशस्वी झाल्या आहेत. त्यात पुणे शहरातील ११ गुन्हे घडले आहेत.
लाचखोरीत महसूल विभाग आणि पोलीस पुढे असल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्यात जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे जमीन खरेदी विक्रीतून वाद उदभवतात. परिणामी महसूल आणि पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी याचा गैरफायदा घेऊन लाचेची मागणी करतात. त्यापैकी काहीच जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येतात. यात प्रामुख्याने ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी, उतारा देण्यासाठी लाचेची मागणी केली जात असल्याचे दिसून आले. पुणे शहरात उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्याचा गैरफायदा महापालिका अधिकारी अभियंते, ठेकेदारांनी घेतला. त्यातील ३ तक्रारीत उपअभियंता, कनिष्ठ अभियंते यांच्यासह चौघांना लाच घेताना पकडण्यात आले.
लाचखोरीत अधिकारी अव्वल
गेल्या ५ महिन्यात पुणे विभागात ८३ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात पुणे शहराबरोबरच पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकरणे आहेत. त्यात पोलीस विभागाचा पहिला नंबर असून महसूल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
उन्हाळ्यात सर्वाधिक कारवाया
पुणे शहरात उन्हाळ्यात पाणी टंचाई होती. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्यांची टँकरची संख्या वाढली होती. एका दिवशी पाचपेक्षा अधिक खेपा करायच्या असतील तर २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपअभियंता मधुकर थोरात, कनिष्ठ अभियंता अजय मोरे यांना प्रत्येकी २० हजार रुपये लाच घेताना पकडण्यात आले.