लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: महाडीबीटी पोर्टलवर खरिपातील बियाण्यांसाठी जिल्ह्यातील ३ हजार ५०० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. सर्वाधिक म्हणजे १५३७ अर्ज सोयाबीनसाठी आहेत. भातासाठी ६२६ अर्ज आहेत. त्यानंतर तूर, बाजरी, वरई अशा पिकांसाठी बियाण्यांची मागणी आहे.
अनुदानित बियाणे प्रमाणित बियाणे, प्रात्यक्षिकासाठी बियाणे, मिनी किट व आंतरपिके ( एकाच वेळी दोन पिके) अशा चार प्रकारांत दिले जाते. पुणे जिल्ह्यात प्रमाणित बियाण्यांसाठी २४३८, प्रात्यक्षिकासाठी ८५५, मिनी कीटसाठी ५५ व आंतरपिकासाठी १७९ अर्ज महाडीबीटीवर आले आहेत.
कृषी विभागाकडून आता आलेल्या अर्जांमधून सोडत काढली जाईल. सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या शेतकर्यांना किमतीच्या ५० टक्केच रक्कम भरून बियाणे मिळेल. पात्र ठरल्याचा एसएमएस त्यांंना मोबाईलवर मिळणार आहे. त्याचवेळी तालुका कृषी अधिकारी व त्या तालुक्यातील महाबीज विक्रेत्यालाही संबधित पात्र शेतकऱ्याची माहिती मिळेल. शेतकऱ्याने दुकानात जाऊन ओळख पटवली की त्याला अनुदानाची रक्कम वगळून उर्वरित किमतीत बियाणे मिळेल.
प्रमाणित बियाण्यांसाठी किमतीच्या ५० टक्के अनुदान आहे. प्रात्यक्षिकमध्ये शेतीचा प्लॉट निश्चित करून तिथे नव्या वाणाचे बियाणे त्याच्या प्रसारासाठी वापरतात. मिनीकिट अल्पभूधारकांसाठी असते. त्यामुळे प्रात्यक्षिक तसेच मिनी किटसाठी जवळपास १०० टक्के अनुदान मिळते. आंतरपीकमध्ये बियाण्यांसाठी अनुदान कमी असते.
या योजनेसाठी केंद्र सरकार अनुदान देते. ते देतानाच पीकनिहाय लक्ष्यांक निश्चित करून दिला जातो. त्याच प्रमाणात सोडत काढली जाते. सोडत राज्य स्तरावर महाआयटीकडून निघते. राज्यस्तरावर प्रक्रिया होत असली, तरी सोडत तालुकानिहाय म्हणजे प्रत्येक तालुक्यातून आलेल्या अर्जांमधूनच काढली जाते. लक्ष्यांक निश्चित असल्याने त्यापेक्षा जास्त अर्ज असतील तर सोडत काढतात.
--//
अर्ज करण्याची मुदत आता संपली आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने आता शेतकऱ्र्यांना सोडतीची प्रतीक्षा आहे. बहुधा बुधवारीच ही प्रक्रिया पार पडून पात्र शेतकऱ्यांची नावे निश्चित होतील.
- ज्ञानेश्वर बोटे- जिल्हा कृषी अधीक्षक.