सावकराविरोधात गुन्हा दाखल
माळेगाव : व्याजापोटी घेतलेल्या अवघ्या चार लाख रुपयाच्या बदल्यात तब्बल छत्तीस एकर जमीन बळकावणाऱ्या सोनकसवाडी (ता. बारामती) येथील सावकारा विरोधात माळेगांंव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही जमिन भू दानची आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत गणराज रावसो घुले (रा. शिवनगर माळेगाव बु )यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी केशव आनंदराव कोकरे यांच्या विरोधात फसवणूक व सावकारीचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, १९९६ मधे फिर्यादीची आई आजारी असल्याने पैशाची गरज ओळखून हनुमानवाडी पणदरे येथील आनंदराव साहेबराव कोकरे(मयत) व त्यांचा मुलगा केशव कोकरे यांच्याकडून रोख स्वरूपात पंच्याहत्तर हजार व उरलेली तिन लाख पंचविस हजार टप्याटप्याने पाच टक्के व्याजाने एकुण चार लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात २० एकर क्षेत्र कोकरे यांनी कुलमुखत्यारपत्र ताबेपावती व साठेखत करारनाम्याने घेतले होते. सलग बारा वर्ष या रकमेचे व्याज रोख स्वरूपात दिले होते. त्यानंतर काही महिन्यांचे व्याज थकल्याने २२ फेब्रुवारी २००७ रोजी जबरदस्तीने, धाक दाखवून व दमदाटीने राहिलेले क्षेत्र कुलमुखत्यारपत्र ताबेपावती व साठेखत करून घेतली.
डिसेंबर २०१८ पर्यत फिर्यादीने कोकरे यांना नऊ लाख चाळीस हजार रक्कम दिली. यानंतर क्षेत्र माघारी देण्याची मागणी केली असता कोकरेंनी नकार दिला. यानंतर फिर्यादीने वकिला मार्फत ताबेपावती रद्द करण्यात आल्याची नोटीस दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास सब इन्स्पेक्टर श्रीगणेश संभाजी कवितके करीत आहेत.
———————————————————