आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात घोडनदीवर बांधण्यात आलेल्या डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात यंदा झपाट्याने घट होत आहे. पाणीसाठ्याच्या दृष्टीने कुकडी प्रकल्पातील हे सर्वांत मोठे धरण आहे. या धरणाच्या पाणीसाठ्यावरच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, करमाळा या तालुक्यातील गावे, तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. पावसाळ्यात धरणातून खरीप व रब्बीसाठी आवर्तने झाल्याने या धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. यामुळे पाणलोट क्षेत्रातील बोरघर-अडिवरे,पाटण-महाळुंगे व बेंढारवाडी येथील पाणलोट क्षेत्र मोकळे होऊ लागल्याचे चित्र आहे. या धरणाच्या पाण्यावरच आदिवासी भागातील पोखरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अवलंबून असून या भागातील सहा गावांना या योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही होत असून धरणातून दररोज जवळपास ९ ते १० मि.मि.पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.
डिंभे धरणात आजमितीस ३६ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक राहीला असून पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासी गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची चिन्हे आहेत.(छायाचित्र-कांताराम भवारी)