पुणे : डेटींग अॅप्स आणि डेटींग साईट्सवरुन तरुणीसोबत झालेली मैत्री एका आयटी कंपनीतील बड्या अधिकाºयाला चांगलीच महागात पडली आहे. या तरुणीने त्याला तब्बल ३७ लाख ५४ हजारांना गंडविले असून याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आठ मोबाईल धारक व २३ बँक खातेधारकांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अभिजीत सुर्यकांत शिवरकर (वय ३२, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरकर हे एका सॉफ्टवेअर डाटा अॅनालॅसिस कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर काम करतात. मोठ्या पगारावर काम करणाऱ्या शिवरकर यांची एका डेटींग साईटवरुन मार्च २०१९ मध्ये स्टेफनी जॉन्सन नामक तरुणीसोबत ओळख झाली. त्यांच्यामध्ये वारंवार चॅटींगच्या माध्यमातून बोलणे होत होते. तरुणीने त्यांना भारतामध्ये मोठी रक्कम घेऊन येत असल्याचे कळविले होते. त्यानंतर काही दिवसांनी शिवरकर यांना कस्टम आॅफिसर बोलत असल्याचे सांगत एकाने फोन केला होता. स्टेफनी हिच्याजवळ दहा हजार पौंड रक्कम मिळाली असून तिची सुटका करण्यासाठी कस्टम शुल्क भरण्यास सांगितले. त्याने दिलेल्या बॅँक खात्यावर त्यांनी काही रक्कम भरली. त्यानंतर आरोपींनी त्यांना कस्टम चार्जेस, मनी लॉड्रींग सर्टिफिकेट, बँक प्रक्रिया शुल्क, प्राप्तिकर, जीएसटी चार्जेस, डेबिट कार्ड अशी विविध कारणे सांगून २३ बँक खात्यामध्ये तब्बल ३७ लाख ५४ हजार भरावयास भाग पाडले. चार ते पाच महिने सुरु असलेला हा प्रकार थांबण्याचे नाव घेत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विमानतळ पोलिसांकडे वर्ग केला आहे.
डेटींग साईटवरील मैत्री पडली आयटी कंपनीच्या अधिकाऱ्याला महागात; ३७ लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 8:56 PM
डेटींग अॅप्स आणि डेटींग साईट्सवरुन तरुणीसोबत झालेली मैत्री...
ठळक मुद्देविमानतळ पोलिसांंनी केला गुन्हा दाखल