पुणे : गेल्या २० दिवसांमध्ये पुणे शहरात वादळी पावसामुळे तब्बल ३७२ झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये जीवितहानी झाली नाही हे सुदैवी आहे, पण अनेक वाहनांचे नुकसान झाले आणि रस्ते बंद होऊन वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.
यंदा माॅन्सूनपूर्व पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले आहे. दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी वादळी पाऊस यामुळे शहरातील झाडे पडली. अनेक झाडे रस्त्यालगतची आहेत, जी रस्त्यात पडली आणि त्यामुळे शहरात प्रचंड कोंडी झाली. हाच अनुभव सोमवारी (दि.२०) पुणेकरांनी वानवडी, घोरपडी, सोलापूर रोडवर नागरिकांना मिळाला. सायंकाळनंतर दोन तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. एम्प्रेस गार्डन येथे भले मोठे झाड पडल्याने रस्ता ब्लाॅक झाला. परिणामी सर्वत्र कोंडी झाली.
येत्या दोन तीन दिवस दररोज सायंकाळी वादळी पाऊस येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सायंकाळी घराबाहेर पडू नये, अन्यथा कोंडीत अडकण्याची भीती आहे. तसेच वादळी वारे असल्याने अपघात होण्याची शक्यता देखील आहे. नागरिकांना हवामान विभागाने काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. रोडवर पडलेली झाडं काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने केले.