लोणावळा - लोणावळेकर झोपेत असताना मुसळधार पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील 24 तासात शहरात तब्बल 375 मिमी पाऊस झाला असून यापैकी 300 मिमी पाऊस हा शुक्रवारची रात्र ते शनिवारचे पहाटे दरम्यान पडला आहे. मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजिवन विस्कळीत झाले आहे. नांगरगाव येथिल जाधव काॅलनी व विघ्नहर सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. वलवण नांगरगाव रस्ता, नांगरगाव ते भांगरवाडी रस्ता, मावळा पुतळा चौक, ट्रायोज माॅल समोरील रस्ता, बापदेव रोड, नारायणी धाम रस्ता पाण्याखाली गेला आहे. बद्रीविशाल सोसायटीला देखिल पाण्याचा विळखा पडला आहे. शुक्रवार रात्रभर पावसाने लोणावळा व परिसरात झोडपून काढल्याने ग्रामीण भागातून वाहणार्या इंद्रयणी नदीला डोंगरगाव, सदापुर, कार्ला, मळवली परिसरात पुर आला असून पुराचे पाणी सर्वत्र पसरले आहे. मळवली भागातील अनेक सोसायट्याच्या परिसरात पाणी साचल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे. पावसाची संततधार कायम असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
भुशी धरणावर जाण्याचा मोह टाळा
लोणावळ्यातील प्रसिध्द भुशी धरणाच्या सांडव्यावरुन प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने धरणाच्या पायर्यावर जाणे धोकादायक झाले आहे. लोणावळ्यात येणार्या पर्यटकांनी या धोक्याची नोंद घेत धरणाच्या पायर्यांवर जाणे टाळावे. शुक्रवारी पायर्यावर आडकलेल्या सहा पर्यटकांनी स्थानिक दुकानदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले.
धबधब्याखाली जाऊ नका
लोणावळा शहरात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्यांमधून वेगाने पाणी वाहत आहे. ह्या पाण्यात जाणे धोकादायक असल्याने पर्यटकांनी धबधब्यांची खाली जाणे टाळावे.