पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठीच्या आॅनलाइन प्रवेशाच्या पहिल्या फेरीत राज्यभरातून ३७ हजार ९७५ प्रवेश झाले आहेत. आरटीई प्रवेशाच्या जागा पहिल्या फेरीअखेर मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या आहेत. या जागांच्या प्रवेशासाठी दुसरी फेरी १६ एप्रिलपासून सुरू होणार असून, त्यासाठीची लॉटरी सोडत १८ व १९ एप्रिल रोजी काढली जाणार आहे.राज्यभरातील ९ हजार शाळांमध्ये आरटीई प्रवेशाच्या १ लाख २६ हजार जागा उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी ५६ हजार २३८ अर्ज आले होते. त्यापैकी पहिल्या फेरीअखेर ३७ हजार ९७५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. रिक्त राहिलेल्या जागांसाठी दुसरी फेरी १६ एप्रिलपासून सुरू होत आहे. १६ एप्रिल रोजी रिक्त राहिलेल्या जागांची माहिती प्रकाशित केली जाईल. त्यानंतर १८ व १९ एप्रिल रोजी लॉटरीची सोडत काढून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली जातील. त्यांना प्रवेश घेण्यासाठी २० एप्रिल ते ५ मे २०१८ पर्यंत वेळ दिला जाईल, अशी माहिती राज्याचे उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली.पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या फेरीसाठी विचार केला जाणार नाही. पहिल्या फेरीत आरटीई प्रवेशासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली, त्यामुळे त्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली नाही. शासनाकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आरटीई शुल्काचा परतावा दिला नसल्याने पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडून प्रवेश देण्यास आडकाठी करण्यात आली होती. त्याचबरोबर ४१ शाळा न्यायालयातदेखील गेल्या आहेत. त्यानंतर शासनाने या शाळांच्या शुल्काचा परतावा संबंधित शाळांच्या खात्यात जमा केला आहे. शाळेत प्रवेश निश्चित झाल्याच्या तुलनेत प्रत्यक्ष प्रवेश घेतलेल्यांची संख्या कमी आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळूनही १८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही.>प्रशासक नेमण्याचा एकही प्रस्ताव नाहीआरटीईअंतर्गत प्रवेश देण्यास नकार देणाºया शाळांवर कारवाई करून तिथे प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्राथमिकच्या संचालकांनी दिले होते. मात्र, त्यानुसार आतापर्यंत एकाही शाळेवर प्रशासक नेमण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव आलेला नाही. पहिली फेरी शुक्रवारी संपली असल्याने याबाबतची माहिती मिळण्यास आणखी वेळ लागणार आहे.>त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्नही लवकरच निकालीआरटीई प्रवेशाचे परतावा शुल्क शासनाकडून मिळाले नसल्याने ४१ शाळा न्यायालयात गेल्या होत्या. तिथल्या प्रवेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत तिथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व शाळांचे परतावा शुल्क शासनाकडून जमा करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या १८ एप्रिल रोजी न्यायालयात होणाºया सुनावणीमध्ये ही स्थगिती उठण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश घेता येईल. हे प्रवेश रिक्त ठेवूनच दुसºया फेरीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
आरटीईचे ३८ हजार प्रवेश, मोठ्या प्रमाणात जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:33 AM