पुणे : गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील अनेक नवीन रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. तसेच नवीन ३९ अपघात प्रवण स्थळे (ब्लॅक स्पॉट) शोधले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हा ग्रामीण अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत रस्त्यावरील अपघात कमी करण्याबाबत विविध अशासकीय संस्थांचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे उपस्थित होते.
रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघात प्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्वरित कार्यवाही करावी, अपघाताच्या वेळी मदतीसाठी त्वरित धावून जाणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
वाहतुकीच्या नियमांबाबत शाळांमधून पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून माहिती देण्यात येत असून, जिल्ह्यातील विद्यापीठात देखील असाच अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे ससाणे यांनी यावेळी सांगितले.