पुणे : कोरोनाच्या निर्बंधामुळे कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाला यंदा मोठ्या संख्येने अनुयायी येण्याची शक्यता गृहित धरून आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. यासाठी १७ ठिकाणी पार्किंग, पीएमपीच्या ३९० बसगाड्या तसेच ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
विधानभवन येथे कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, “अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात याव्यात. (ग्रामीण मार्ग क्रमांक ४), राज्य मार्ग ११८ लोणीकंद ते डोंगरगाव रस्ता करणे (ग्रामीण मार्ग क्रमांक ५), पुणे नगर रस्ता ते प्रजिमा २९ या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ६० लाख रुपये जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येतील.”
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून नोव्हेंबरपासूनच तयारी सुरू केली आहे. प्रांताधिकारी, स्थानिक पोलिस ठाणे, पोलिस उपअधीक्षक यांच्या स्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत. यंदा जास्त नागरिक येणार असल्याचे गृहित धरूनच १७ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. पीएमपीकडून गेल्या वर्षी २६० बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा शहराच्या विविध भागातून ३९० बसगाड्या याठिकाणी सेवा देणार आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी १३० टँकर आणि पुनर्वापर करता न येणारे दोन लाख ग्लास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.’’
नगर रस्त्यावर वाहतुकीत बदल
याबरोबरच १५० आरोग्य सेवक आणि कर्मचाऱ्यांसह १५ रुग्णवाहिका याठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी महामार्गांवर मोठे फलक लावण्यात येणार आहेत. यंदा तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक बदल पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडून केले जाणार असून ते लवकरच जाहीर केले जातील, असेही देशमुख यांनी सांगितले.