रांजणगाव गणपती (पुणे) : येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त दोन दिवस आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत ३९२ बैलगाडे धावले असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष शिवाजी शेळके, खजिनदार मानसिंग पाचुंदकर यांनी दिली.
श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त बुधवार, दि. १९ व गुरुवारी, दि. २० असे दोन दिवस बैलगाडा शर्यत मोठया उत्साहात पार पडल्याने गाडाशौकीन, गाडा मालक व ग्रामस्थांनी शर्यती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. विजेत्या बैलगाडा मालकांना एकूण ११ लाख ११ हजार १११ रुपये रोख तसेच लाखोंच्या भेटवस्तूही बक्षीस म्हणून देण्यात आल्या. यात्रेनिमित्त गुरुवारी, दि. २० सकाळी सात वाजता खंडोबा देवाची महापूजा व अभिषेक यात्रा कमिटीचे खजिनदार मानसिंग पाचुंदकर यांच्या हस्ते करण्यात आला.
दोन दिवस पार पडलेल्या या गाडा शर्यतीत शिवराज नारायण आव्हाळे (आव्हाळवाडी) व प्रवीण रामदास आव्हाळे (आव्हाळवाडी) यांचे बैलगाडे घाटाचा राजाचे मानकरी ठरले; तर शिवराज नारायण आव्हाळे, प्रवीण रामदास आव्हाळे (आव्हाळवाडी), सागर दिलीप गायकवाड (तळेगाव ढमढेरे), फक्कड मार्तडराव शिंदे (कान्हूर मेसाई), नीलेश पांडुरंग काळे (गव्हाणवाडी) व विकास कुशाबा वाडेकर (बहुळ) हे बैलगाडे फायनल शर्यतीचे मानकरी ठरले.
जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या या बैलगाडा घाटात यंदा प्रथमच दोन दिवस बैलगाडा शर्यती पार पडल्या. बैलगाडा शर्यतींना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक आबासाहेब पाचुंदकर, माजी सभापती सुभाष उमाप, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर, आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. बैलगाडा शर्यतीचे समालोचन ज्ञानेश्वर मुळे, दौलत पऱ्हाड, अण्णा जाधव यांनी केले.