पुणे : उत्तरेकडून आलेल्या थंड वाऱ्यामुळे पुणेकर गारठले असून, रविवारी सकाळी या हंगामातील सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. पुणे शहरातील किमान तापमान ९.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. नोव्हेंबर महिन्यातील गेल्या दशकातील हे तिसरे नीचांकी किमान तापमान ठरले आहे.
या हंगामात ऑक्टोबर महिना संपत असतानाच थंडीची जाणीव झाली होती. अरबी समुद्रातून सायंकाळी येणारे आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे पुणे शहरात ऑक्टोबरचा शेवट व नोव्हेंबर महिन्याचे सुरुवातीचे दिवस उबदार असतात. यंदा अरबी समुद्राहून येणाऱ्या हवेला सातत्याने अडथळे येत गेले. परिणामी, पुणे शहरातील किमान तापमान गेल्या काही दिवसांपासून सरासरीच्या तुलनेत कमी राहिले आहे. शनिवारी किमान तापमान ११.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. त्यात रविवारी १.६ अंशांची घट झाली.
यापूर्वी १९ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यात किमान तापमान ७.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यानंतर २७ नोव्हेंबर २०१६ रोजी ९.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यानंतर रविवारी ९.७ अंश सेल्सिअस इतके होते. नोव्हेंबर महिन्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान २७ नोव्हेंबर १९६४ रोजी ४.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.
पुण्यातील तापमान
१९ नोव्हेंबर २०१२ - ७.९ अंश
२७ नोव्हेंबर २०१६ - ९.३ अंश
२० नोव्हेंबर २०२२ - ९.७ अंश