खोडद : हिवरे तर्फे नारायणगाव येथील शिवहरीनगर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात १ शेळी, २ करडे ठार झाली. ही घटना बुधवारी रात्री १२ च्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, गुरुवारी (दि. ४) दुपारी एकच्या सुमारास बिबट्याने पुन्हा हल्ला करून शेळी ठार केली. या घटनेची दखल घेत वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला.
हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकरी हेमेंद्र पंढरीनाथ खोकराळे यांची एक शेळी व दोन करडे बुधवारी रात्री बिबट्याने हल्ला करून ठार केली, तर याच वस्तीतील अभिजित लक्ष्मण खोकराळे यांची एक शेळी गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ठार केली. वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे, वनपाल एस. आर. खट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी आकाश तंगडवार, नाथा भोर यांनी येथे गुरुवारी सायंकाळी पिंजरा लावला आहे. पिंजरा लावण्यासाठी उपसरपंच सुधीर खोकराळे, जगन खोकराळे, बारकू खोकराळे, अर्जुन खोकराळे, हेमेंद्र खोकराळे, अभिजित खोकराळे, नंदा खोकराळे यांनी परिश्रम घेतले.ऊसतोड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ऊसतोडणीमुळे सध्या बिबट्याचा अधिवास कमी होत आहे. सध्याचा तीव्र उन्हाळा, सध्या सुरू असलेली ऊसतोड आणि पाण्याची कमतरता पाणी आणि भक्ष्याच्या शोधात बिबटे आता मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. संवेदनशील भागात किंवा ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी पिंजरा लावला जाईल.बी. सी. येळे,वनपरिक्षेत्र अधिकारी,ओतूर