पुणे : लष्करी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीवरून अमली पदार्थविरोधी पथकाने एका नायजेरियन व्यक्तीला पकडून त्याच्याकडून ४ लाख रुपयांचे २० ग्रॅम १६० मिलिग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे.
शोएब तौफिक ओलाबी (वय ४०, रा़ झु व्हिलेज, वाशी, नवी मुंबई, मूळ रा. नायरेरिया) असे त्याचे नाव आहे.
सदर्न कमांड येथील लष्करी गुप्तहेरांकडून पुणे पोलिसांना नायजेरियनविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथकाने बाणेर येथील मित्रनगर कॉलनीतील सार्वजनिक रोडवर सापळा लावला. तेथे आलेल्या शोएब ओलाबी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेले ४ लाख ३ हजार २०० रुपयांचे २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन दोन मोबाईल, नायजेरिया देशाचा पासपोर्ट, रिकाम्या प्लास्टिकच्या २२ पिशव्या, टिक्सोटेप असा माल जप्त करण्यात आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक सुजीत वाडेकर यांच्या फिर्यादीवरून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने अधिक तपासासाठी आरोपीची ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक डी़ एल़ चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली़.