पुणे : मध्य रेल्वेच्या पाच रेल्वे गाड्यांना व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आले आहेत. त्यातील तीन पुणे - मुंबई मार्गावर आणि एक पुणे - सिकंदराबाद मार्गावर धावणाऱ्या रेल्वेला जोडण्यात आला. त्याला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे वर्षभरात व्हिस्टाडोमने प्रवास केलेल्या प्रवाशांच्या आकडेवारीवरून दिसून येते. पुणे रेल्वे विभागातर्फे दिलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात पुण्यातून ३७ हजार ९४८ प्रवाशांनी व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास केला. त्याद्वारे पुणे विभागाला चार कोटी १८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मध्य रेल्वेकडून मुंबई - गोवा आणि पुणे - मुंबई मार्गावरील रेल्वे गाड्यांना व्हिस्टाडोम कोच बसवण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे विभागातून धावणाऱ्या चार गाड्यांचा समावेश आहे. २०१८ साली मुंबई- मडगाव (गोवा) जनशताब्दी एक्स्प्रेसला पहिला व्हिस्टाडोम कोच बसवण्यात आला होता. या कोचला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर २६ जून २०२१ पासून पुणे - मुंबई डेक्कन एक्सप्रेसला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला. तिसरा विस्टाडोम कोच १५ ऑगस्ट २०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला. २५ जुलै २०२२ रोजी चौथा विस्टाडोम कोच प्रगती एक्स्प्रेसला जोडण्यात आला होता. पुणे-मुंबई दरम्यानच्या मार्गावर दऱ्या, खोऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत. पावसाळ्यात तर या मार्गावर व्हिस्टडोममधून जाणे म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळे प्रवाशांकडून व्हिस्टाडोमला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे मुंबई मार्गावर व्हिस्टाडोमला चांगला प्रतिसाद मिळत असताना मध्य रेल्वेने १० ऑगस्टपासून पुणे - सिकंदराबाद शताब्दीला विस्टाडोम कोच जोडण्यात आला. पुणे- सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना उजनी बॅकवॉटर आणि भिगवणजवळील धरणाचा आनंद घेता येत आहे. तसेच विकाराबादजवळील अनंतगिरी टेकड्यांमधून जाताना जंगलातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यास मिळत आहे. त्यामुळे अल्पावधीतच शताब्दीचा व्हिस्टाडोम प्रवाशांच्या पसंतीला उतरला आहे.
पुणे विभागातून धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, शताब्दी, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोमला गेल्या आर्थिक वर्षात प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रवाशांना कधी-कधी एक ते दोन महिने व्हिस्टाडोमचे तिकीट मिळत नाही. गेल्या आर्थिक वर्षात चार गाड्यांमधून ३६ हजार ९४८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामधून पुणे रेल्वे विभागाला चार कोटी १८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.