बारामती: बारामतीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरी देखील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीये. शेवटी पोलीस प्रशासनाने शक्कल लढवत विनाकारण फिरणाऱ्यांचीच अँटीजन टेस्ट सुरु केली आहे. सुरवातीच्या केलेल्या ८ नागरीकांच्या तपासणीत ४ जण पॉझिटीव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात कडक लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी बारामतीत सुरु करण्यात आली आहे. आता या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेने लढविलेली अनोखी शक्कल कौतुकाचा विषय ठरला आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरीकांची आरोग्य प्रशासनाच्या मदतीने अँटीजन तपासणी सुरु आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठीही मदत होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र तपासणी व्हॅन आणि आरोग्य पथक नेमण्यात आले आहे.
काल दिवसभरात बारामतीत एकूण ३९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये शहरात १९५, ग्रामीण भागात १९६ रुग्णांचा समावेश असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी सांगितले. आजपर्यंत बारामतीत एकूण रूग्णसंख्येने आता १५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर ११३४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.