लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील गुंडगिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण शहरात पोलिसांनी एकाच वेळी ‘कोंबिंग ऑपरेशन’ करुन गुन्हेगारांची झाडझडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी १ हजार २१३ गुन्हेगार एकाच रात्री तपासले. या कारवाईत शहरात आलेल्या ९ तडीपार गुंडांना अटक करण्यात आली. गुन्हेगारांकडून ४ पिस्तुले, ४० कोयते, ५ तलवारी, कुलरी, पालघन, सुरा अशी ४९ शस्त्रे जप्त करण्यात आली. संपूर्ण शहरात एकाचवेळी व इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच अशाप्रकारची कारवाई झाली.
मंगळवारी रात्री ९ ते पहाटे १ वाजेपर्यंत शहरात केलेल्या या कारवाईची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी (दि. १६) पत्रकार परिषदेत दिली. सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, लक्ष्मण बोराटे यावेळी उपस्थित होते.
या कारवाईत पाचही परिमंडळ व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त, १२ सहायक आयुक्त, ३० पोलीस ठाण्याचे निरीक्षक व त्यांचे कर्मचारी, गुन्हे शाखेची १० पथके, २८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी भाग घेतला. कारवाईदरम्यान पोलिसांकडे असलेल्या रेकॉर्डवरील १ हजार २१३ गुन्हेगारांचा माग काढला असता यातले ५७२ गुन्हेगार मिळून आले. खास करून ‘टॉप २०’ असे ३७२ गुन्हेगारांचा माग काढला असता २१५ गुन्हेगार आढळले. तसेच, सराईत ५३० आरोपी तपासण्यात आले. खून व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पॅरोलवर सुटलेल्या १२१ पैकी ७३ गुन्हेगार आढळून आले. शोध सुरु असलेल्या १९० गुन्हेगारांपैकी मात्र फक्त दोघेच पोलिसांना सापडले.या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५ पिस्तूल व ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.